लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र सोयीसुविधांअभावी आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरू लागला आहे. महामंडळाच्या बसेसमध्ये असलेल्या प्रथमोपचार पेट्या रिकाम्या आहेत. याकडे महामंडळाचे दुर्लक्ष असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चित्र मुंबई सेंट्रल बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे.
गेल्यावर्षी राज्यात २५ हजार ४५६ रस्ते अपघातात ११ हजार ४५२ मृत्यू तर २० हजार १३७ जण जखमी झाले होते. त्यामुळे या वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध असायला हव्यात. यात एसटीमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा, प्रथमोपचार पेटी असली पाहिजे. याबाबत बसेसची पाहणी केली असता अनेक बसमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे, परंतु लालपरीमध्ये प्रवास करीत असताना कुठे काही अपघात झाला तर प्रवाशांसह चालक, वाहकांवर प्रथम उपचार करण्यासाठी चालकाच्या केबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. त्या पेट्याही एसटी बसमधून गायब झाल्या आहेत. त्यातील साहित्य बेपत्ता झाल्याचे दिसून आले.
-
आगारात बसस्थानक आओ जाओ घर तुम्हारा
मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानकात येणाऱ्या जाणाऱ्यांना कुणी हटकले नाही. येथील बसस्थानकामध्ये आओ जाओ घर तुम्हारा असाच प्रकार सुरू आहे
---
अग्निशमन यंत्रणेकडे दुर्लक्ष
बसेसची पाहणी केली असता एक दोन बसमध्ये अग्निशमन यंत्रणाच नसल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धास्तीने प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज आहे.
---
वायफाय सुविधा नावालाच
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मनोरंजन व्हावे, याकरिता प्रत्येक बसमध्ये वाय-फाय यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र वायफाय बंद असल्याचे एका वाहकाने सांगितले.
----
कोरोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी
मुंबई सेंट्रल बसस्थानकात प्रवेश करण्यापूर्वीच तेथील सुरक्षारक्षक प्रवेशद्वारावरच तोंडाला मास्क लावा, असे आवाहन करीत आहेत. मास्क न वापरलेल्या प्रवाशांना बसस्थानकामध्ये प्रवेश दिला जात नाही.
----
या बसच्या प्रथमोपचार पेट्या रिकाम्या
१ मुंबई ते परळी वैजनाथ(एम एच १३ सीयू ८१२९)
२ दादर ते नाशिक (एम एच ०९ ई एम २२३२)
३ मुंबई ते पणजी (एम एच ०९ एफ एल १०६८)
४ चिपळूण ते मुंबई (एम एच ०९ एफ एल ०९८५ )
५ देवरुख ते मुंबई (एम एच ०६ बी डब्ल्यू ०५३९)
----
प्रथमोपचार पेटीमधील वस्तू काही महिन्यांपूर्वी वाहकांना देण्यात आल्या आहेत. पण बसमध्ये प्रथमोपचार पेटी नसल्याबाबत तपासणी करण्यात येईल , ज्या बसमध्ये प्रथमोपचार पेटी नसेल त्या बससाठी पेटी दिली जाईल.
- गुलाब बच्छाव, आगार व्यवस्थापक, मुंबई सेंट्रल