रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा त्वरित आवश्यक; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 07:15 AM2024-06-30T07:15:14+5:302024-06-30T07:17:25+5:30
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : रेल्वे प्रवाशांच्या रेल्वे मदद ॲपवर येणाऱ्या तक्रारींचा वेगाने निपटारा करा. तसेच पावसाळ्यात रेल्वेसेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना करा, अशा सूचना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना दिल्या आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या पावसाळी कामांच्या तयारीचा आढावा शुक्रवारी रात्री घेतला. रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल आणि पश्चिम रेल्वेचे नीरज वर्मा यांनी माध्यमांशी शनिवारी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसाळी कामांची माहिती दिली.
रेल्वे मदद पोर्टलवरून प्रवाशांना फोटो आणि व्हिडीओ पाठवून तक्रार करण्याची मुभा आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या या तक्रारी सोडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये वॉर रूम तयार केली आहे. त्याद्वारे तक्रारींचा निपटारा वेगाने होत आहे. तसेच बऱ्याचदा गर्दीचे व्हिडीओ, पाणी साचल्याचे जुने फोटो व्हायरल होतात. अशा तक्रारींवर योग्य माहिती देऊन प्रवाशांना समाधानकारक प्रतिसाद दिला जात असल्याची माहिती यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
नावीन्यपूर्ण यंत्रणा विकसित
- पश्चिम रेल्वेने पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेजमधील अडथळे शोधण्यासाठी रिमोट कंट्रोल संचालित कॅमेऱ्यांची बोटसदृश यंत्रणा विकसित केली. त्यातून पाण्याच्या प्रवाहातील अडथळे शोधून नालेसफाई करण्यास रेल्वे प्रशासनाला मदत होत आहे. तर मध्य रेल्वेने साचणाऱ्या पाण्यातही पॉइंट कार्यान्वित राहावेत, यासाठी जलरोधक आवरण तयार केले आहे.
- संवेदनशील पुलांवरील पाण्याच्या पातळीची माहिती तत्काळ व्हावी यासाठी पल्स रडार आधारित निरीक्षण प्रणाली विकसित केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
- दरम्यान, हा नावीन्यपूर्ण कल्पना देशातील अन्य रेल्वे विभागांमध्येही वापराव्यात, अशा सूचना रेल्वेमंत्र्यांनी दिल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.