Join us

वायू प्रदूषण होणार कमी; स्वस्त अन् मस्त देशी सेन्सर मोजतेय हवेची गुणवत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:06 AM

मुंबई महानगर क्षेत्रात पथदर्शी अभ्यासलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात केलेल्या पथदर्शी ...

मुंबई महानगर क्षेत्रात पथदर्शी अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रात केलेल्या पथदर्शी अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, कमी किमतीच्या सेन्सरनी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कार्यक्षमतेने काम केले असून, देशातील वायू प्रदूषणाच्या वाढत्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर, भारतभर प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी असे आवश्यक जाळे वाढवणे आवश्यक आहे. यासाठी गुंतवणुकीच्या स्वरूपात एक मोठी अडचण असली तरी अशा परिस्थितीत, कमी किमतीच्या देशी सेन्सिंग डिव्हाइस (सेन्सरने) आता एक नवीन आशा निर्माण केली आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, भारतीय तंत्रज्ञान संस्था (कानपूर) आणि ब्लूमबर्ग फिलंट्रॉफिस यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सात महिन्यांच्या पथदर्शी अभ्यासाच्या निकालानुसार, स्थानिक स्टार्टअप्सने विकसित केलेल्या कमी किमतीच्या सेन्सर्सने ८५ ते ९० टक्के कार्यक्षमतेने काम केले. हे निष्कर्ष खूपच प्रोत्साहनदायक आहेत. तसेच भविष्यात प्रदूषण नियंत्रण केंद्रांच्या विस्तृत नेटवर्कची कल्पना करण्यास नवीन आधार देत आहेत. या अभ्यासासाठी, चार वेगवेगळ्या स्टार्टअप्सने ४० परवडणारे सेन्सर विकसित केले. हा अभ्यास नोव्हेंबर २०२० ते मे २०२१ दरम्यान करण्यात आला. त्यासाठी ४० कमी किमतीचे मॉनिटरिंग सेन्सर्स बसविण्यात आले. त्यापैकी मुंबईत १० आणि नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई-विरार, बोरिवली, विमानतळ, पवई आणि डोंबिवली येथे सौर ऊर्जेवर चालविणारे प्रत्येकी एक सेन्सर बसविले होते.

* वापरात आणण्यासाठी सज्ज

देशातील हवेच्या गुणवत्तेच्या देखरेखीसाठी स्वदेशी सेन्सर तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरात आणण्यासाठी सज्ज असल्याचे मुंबई सेन्सर प्रयोगाच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. लॉकडाऊनसारख्या कठीण काळातही या सेन्सरने चांगले काम केले.

- डॉ. एस. एन. त्रिपाठी, आयआयटी, कानपूर

* पर्यावरणाशी संबंधित अनेक आव्हाने

आपल्याकडे पर्यावरणाशी संबंधित अनेक आव्हाने आहेत, ज्यामध्ये वायू प्रदूषण सर्वांत जास्त आहे. आपल्यापैकी प्रत्येक जण दररोज ११ हजार लिटर ऑक्सिजन आत घेतो. आम्ही पाण्याच्या बाटल्या खरेदी करू शकतो, परंतु ऑक्सिजनची बाटली खरेदी करण्याची कल्पनाही आपल्याला करवत नाही.

- सुधीर श्रीवास्तव, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

* हॉटस्पॉट तंत्रज्ञानासाठी उपयुक्त!

नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत देखरेखीसाठी आवश्यक असलेल्या स्टार्टअप्सद्वारे तयार केलेले हे प्रभावी सेन्सर हॉटस्पॉट तंत्रज्ञानामध्ये खूप उपयुक्त ठरतील.

- डॉ. व्ही. एम. मोटघरे, सहसंचालक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

* परिणामकारकता चांगली

भारतातील पहिल्याच प्रकारातील प्रयोगात वापरल्या जाणाऱ्या नवीन आणि अनोख्या सेन्सर तंत्रज्ञानाची परिणामकारकता चांगली आहे. यामध्ये प्रचंड क्षमता आहे. वायू प्रदूषणावर उपाय म्हणून मदत करण्यासाठी अधिक चांगली माहिती प्रदान करतील.

- प्रिया शंकर, हवामान व पर्यावरण अभ्यासक

-----------------------