वायू प्रदूषण कमी करा, आयुष्य पाच वर्षांनी वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:05 AM2021-09-13T04:05:10+5:302021-09-13T04:05:10+5:30
मुंबई : जिवाश्म इंधनातून होणारे उत्सर्जन रोखून वातावरण बदलावर मात करण्यासाठी मदत करणारी वायू प्रदूषणाबाबतची धोरणे अतिप्रदूषित भागांतील नागरिकांचे ...
मुंबई : जिवाश्म इंधनातून होणारे उत्सर्जन रोखून वातावरण बदलावर मात करण्यासाठी मदत करणारी वायू प्रदूषणाबाबतची धोरणे अतिप्रदूषित भागांतील नागरिकांचे आयुष्य पाच वर्षांनी वाढविण्यासाठी मदत करू शकतात. या धोरणांमुळे जागतिक स्तरावर नागरिकांचे आयुर्मान दोन वर्षांनी वाढू शकते. मात्र, अशी धोरणे आपण राबविली नाहीत तर मात्र धोका वाढणार असून, वाढत्या प्रदूषणामुळे २००० मध्ये प्रारंभाच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांना २.५ ते २.९ वर्षांचे अधिकचे आयुर्मान गमवावे लागत आहे.
गेल्या वर्षी कोविड १९ च्या टाळेबंदीमुळे जगातील अतिप्रदूषित भागांमध्येही निरभ्र आकाश अनुभवास येत असताना कोरड्या, उष्ण हवेमुळे लागलेल्या वणव्यांमुळे पसरलेला धूर दूरच्या अंतरावरील निरभ्र आकाश असणाऱ्या शहरांपर्यंत पोहोचला. या दोन विरोधी घटनांमुळे दोन प्रकारची भविष्ये समोर दिसत आहेत. या दोन्ही भविष्यांमधील फरक जीवाश्म इंधनांबाबतच्या धोरणांवर अवलंबून असून, वायू प्रदूषणाबाबत सक्षम धोरणे अंगीकारल्यास नागरिकांचे आयुर्मान वाढत असल्याचा निष्कर्ष शिकागो विद्यापीठाच्या अभ्यासात काढण्यात आला आहे.
जागतिक स्तरावरील घातक सुक्ष्मकणांमुळे होणारे प्रदूषण जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कमी होऊ शकले नाही तर नागरिकांना त्यांच्या आयुर्मानातील सरासरी दोन वर्षे दोन महिने गमवावे लागतील. अतिप्रदूषित भागांतील नागरिकांना त्यांच्या आयुर्मानातील पाच किंवा त्यापेक्षाही अधिक वर्षे गमवावी लागतील. घातक सुक्ष्मकणांमुळे होणारे प्रदूषण क्षयरोग, एचआयव्ही/एड्स अशा संसर्गजन्य आजारांपेक्षा आणि धूम्रपान, युद्ध यांसारख्या मानवी दुष्कृत्यांपेक्षाही अधिक विनाशकारी ठरू शकते.
कोरोना काळात नियमितपणे प्रदूषित हवा अनुभवणाऱ्या नागरिकांना स्वच्छ हवेचा अनुभव आला, तर एरव्ही स्वच्छ हवा अनुभवणाऱ्या नागरिकांना प्रदूषित हवेचा अनुभव आला. अशा या अभूतपूर्व वर्षामुळे हवेबाबातच्या धोरणाचे महत्त्व उघड झाले आणि स्थानिक स्तरावर प्रदूषण व वातावरण बदलाचा सामना करण्यासाठी वायू प्रदूषणाबाबतचे धोरण आवश्यक असल्याचे समोर आले. अशा धोरणांमुळे आरोग्य सुधारेल. आयुर्मान वाढेल, असे हवा गुणवत्ता आयुर्मान निर्देशांकातून समोर आले आहे.
- प्रा. मायकेल ग्रीनस्टोन, अर्थशास्त्र, शिकागो विद्यापीठ
एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स : नव्या आकडेवारीनुसार
- दक्षिण आशियामध्ये जगातील सर्वाधिक प्रदूषित देश आहेत.
- बांग्लादेश, भारत, नेपाळ आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.
- जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या या देशांमध्ये राहते.
- जगातील सर्वाधिक प्रदूषित पाच देशांमध्ये या देशांचा समावेश होतो.
-------------------
एअर क्वालिटी लाईफ इंडेक्सनुसार
- जगातील सर्वाधिक तीव्र प्रकारचे प्रदूषण असणाऱ्या उत्तर भारतात अंदाजित परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवतात.
- या भागात दिल्ली आणि कोलकाता या महानगरांचा समावेश आहे.
- २०१९ मधील स्थिती कायम राहिल्यास येथील नागरिकांचे आयुर्मानातील नऊ वर्षांपेक्षा अधिक कालावधी कमी होईल.
- भारतातील वायू प्रदूषणाची उच्चतम पातळी काळानुसार भौगोलिकदृष्ट्या विस्तारत असून, ही धोक्याची घंटा आहे.
- दोन दशकांपूर्वीचा विचार केला असता घातक सुक्ष्मकणांमुळे होणारे प्रदूषण हे केवळ भारतीय वाळवंटांचे वैशिष्ट्य नाही.
-------------------
दक्षिण आशियातील एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स आकडेवारीनुसार
- जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रदूषणाची पातळी घटल्यास प्रत्येक नागरिकाचे आयुष्य सरासरी पाच वर्षांपेक्षाही अधिक कालावधीसाठी वाढू शकते.
- जगात इतरत्र कुठेही आढळणार नाही असा प्रदूषणाचा दहापट निकृष्ट स्तर उत्तर भारतातील ४८० दशलक्ष नागरिक अनुभवत आहेत.
- स्वच्छ हवेसाठीच्या धोरणांचा लाभ अशा अतिप्रदूषित भागांतही होऊ शकतो.