वीजदर कमी करून शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठा करा; नितीन राऊत यांचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 01:31 AM2021-02-25T01:31:55+5:302021-02-25T06:48:51+5:30
नवीन कृषिपंप वीजधोरणात शेतकऱ्यांना ८ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई : राज्यातील विजेचे दर कमी करणे व शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीजपुरवठा देण्यासंदर्भात नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले.
महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेने औद्योगिक ग्राहकांचे वीजदर जास्त असल्याने राज्यात उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. उद्योगांचे वीजदर कमी करणे गरजेचे आहे. त्यामुळे वीजदर किमान १ रुपया प्रतियुनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावे तसेच घरगुती व वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.
नवीन कृषिपंप वीजधोरणात शेतकऱ्यांना ८ तास वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि कृषिपंप वीज वाहिन्या अतिभारित (ओव्हरलोड) होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने वीज वाहिन्यांचे जाळे सक्षम करणे व रोहित्रांची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.