मुंबई : पेट्रोलच्या दरावर शंभरी गाठल्यानंतर आता इंधनावरील करात कपात करावी, अशी मागणी होत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही केंद्र सरकारला करकपातीचा सल्ला दिला आहे.
वाढत्या दरवाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील उच्च अप्रत्यक्ष करात कपात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. दास यांनी बैठकीत म्हटले की, इंधन दरवाढीमुळे महागाईही वाढत आहे. डिसेंबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित खाद्य व इंधनाचा महागाईचा दर ५.५ टक्के राहिला. इंधन दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी संयुक्तरीत्या करकपात करण्याची गरज आहे.
पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले
दोन दिवसांच्या विरामानंतर मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली. पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे. या दरवाढीनंतर दोन्ही इंधनांचे दर आता सार्वकालिक उच्चांकावर गेले आहेत. मुंबईत पेट्रोल ९७.३४ रुपये लीटर झाले. तर डिझेल ८८.४४ रुपये लीटर झाले.
...अन्यथा महागाई वाढेल
डिसेंबरमध्ये घाऊक महागाईचा दर ५.५ टक्क्यांवर गेला होता. त्यात आणखी भर पडून महागाई आणखी वाढेल. वस्तू आणि सेवांचे दर वाढतील, असा इशाराही आरबीआयने दिला आहे.