भारताचा रुपया वधारून महागाई कमी होऊ दे; 200 डॉलरची माळ घालून मनसेचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 10:27 PM2018-09-28T22:27:33+5:302018-09-28T22:54:20+5:30
आझादनगर मनसे कार्यालयासमोर रात्री 9.30 च्या सुमारास अंधेरीच्या राजाची मिरवणूक आली तेव्हा मनसेच्या नेत्यांचे साकडे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : आझादनगर मनसे कार्यालयासमोर आज रात्री 9.30 च्या सुमारास अंधेरीच्या राजाची मिरवणूक आली तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी चक्क आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा रुपया वधारून महागाई कमी होऊ दे, असे साकडे घालत अंधेरीच्या राजाच्या गळ्यात 200 अमेरिकन डॉलर्सची माळच घातली.
एका गणेश भक्तांने नुकताच अंधेरीच्या राजाला 912 किलोचा बुंदीचा लाडू अर्पण केला होता. अंधेरीच्या राजासाठी खास 200 अमेरिकन डॉलर आम्ही मुंबईतील एका परदेशी चलन विकणाऱ्या विक्रेत्याकडून विकत घेतले होते, अशी माहिती विभागअध्यक्ष मनीष धुरी व मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष कुशल धुरी दिली.
मोदी सरकारच्या काळात लवकरच पेट्रोल आणि डिझेल शंभरी पार करण्याची शक्यता आहे. शेअर बाजार कोसळत आहे. ऐन सणासुदीला महागाईत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य जनता महागाई मुळे त्रस्त झाली आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या देशाच्या रुपयांची पत कमी होत आहे. त्यामुळे देशातील महागाई कमी होऊन आपल्या देशाचा रुपया वधारू दे, आणि देशातील 100 कोटी जनतेला आणि सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन येऊ दे, या मागणीसाठी अंधेरीच्या राजालाच आता साकडे घातले असल्याचे धुरी यांनी सांगितले.