औषध विक्रेत्यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जीएसटी परिषदेत कोरोना संबंधित विविध उपकरणे आणि औषधांवरचे जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला. यात मुख्यत्वे ब्लॅक फंगस आणि टोसिलिजुम्बा इंजेक्शवरचा जीएसटी रद्द करण्यात आला. मात्र जीएसटी कमी करून रुग्णांना थेट फायदा होणार नाही, त्यापेक्षा अन्न आणि औषध प्रशासनाने थेट एमआरपी म्हणजेच औषधांची मूळ किंमत कमी करावी, असा सूर डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांमध्ये आहे.
औषधांवरील जीएसटी कमी केला असला तरी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने औषधांची एमआरपी कमी केलेली नाही. त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ ग्राहकांना मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. जीएसटी कमी झाला असला तरी औषधांची विक्री एमआरपीनुसारच होईल. त्यामुळे औषधांची एमआरपी कमी करणे गरजेचे आहे, असे मत ऑल इंडिया फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या औषधांवरील केवळ जीएसटी कमी करून त्याचा फारसा उपयोग गरजूंना होईल असे वाटत नाही. अन्न व औषध प्रशासनाने थेट औषधांच्या किमती कमी करायला हव्यात. ऑक्सिजनचाही जीवनावश्यक औषधांच्या यादीत समावेश करून त्याच्या किमतीही कमी करायला हव्यात. तरच सर्वसामान्यांना कमी किमतीत औषध उपलब्ध होतील. जीएसटी कमी केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता दिसते, असे ते म्हणाले.
............................................