सीमा महांगडे
संडे स्पेशल मुलाखत
मुंबई : राज्याच्या आणि त्या अनुषंगाने मुंबई विभागाच्या दहावीच्या निकालात यंदा कमालीची घट पाहण्यास मिळाली. मुंबई विभागाची मागील पाच वर्षांची निकालाची आकडेवारी पाहता हा नीचांकी निकाल असल्याचे समोर येत आहे. याची नेमकी कारणे काय? बदललेला अभ्यासक्रम, कमी केलेले अंतर्गत गुण, बदललेला प्रश्नपत्रिका आराखडा आणि गुण याचे नेमके काय समीकरण आहे, याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव शरद खंडागळे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासंदर्भात त्यांनी लोकमतशी केलेली ही खास
बातचीत...प्रश्न : यंदा दहावीच्या निकालाचा टक्का घसरल्याचे नेमके कारण काय?उत्तर : दहावीच्या प्रश्नपत्रिका आराखड्यात यंदापासून महत्त्वाचे बदल केले आहेत. तसेच अभ्यासक्रमही बदललेला आहे. अभ्यासक्रम बदलल्यामुळे गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयांसाठी एकच प्रश्नपत्रिका (कृतिपत्रिका) होती. तसेच यंदा भाषा विषयांसाठी अंतर्गत २० गुणदेखील बंद करण्यात आले. लेखी परीक्षेला इंग्रजी व गणित या विषयाची बहुसंच प्रश्नपत्रिका न देण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. कृतिपत्रिकेमुळे आकलनावर आधारित प्रश्नपत्रिका सोडवावी लागल्याने कॉपी करण्याचा प्रश्नच राहिला नाही. एकूणच यंदा दहावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना अनेक बदलांना सामोरे जावे लागले. त्यामुळे निकालाचा टक्का घसरण्याची यातील काही कारणे असू शकतात.
प्रश्न : कृतिपत्रिकेमुळे भाषा विषयांच्या निकालात मोठी घसरण झाली हे खरे आहे का?उत्तर : गेल्या वर्षाशी तुलना केली असता यंदा भाषा म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी विषयांच्या निकालात घसरण झाली हे खरे आहे. अंतर्गत गुण बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांना कृतिपत्रिकेची उत्तरे ही त्यांच्या आकलन क्षमतेनुसार द्यायची होती. नव्या आराखड्यामुळे त्यांची आकलन क्षमता वाढण्यास मदतच होईल. कारण त्यांना फक्त पाठांतर करून चालणार नाही तर विद्यार्थी त्या अभ्यासक्रमातून काय शिकले ते मांडण्याचे कौशल्य पणाला लागले. त्याने काय ज्ञान अवगत केले याचा कस लागला. विद्यार्थ्यांना कृतिपत्रिकेचा सामना करावा लागल्याने काही विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत ३५ गुणही मिळविणे कठीण झाले.स्पर्धेत विद्यार्थ्यांचा टिकाव लागणार का?उत्तर : निकालात घसरण झाली हे खरे आहे, मात्र अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना बेस्ट आॅफ फाइव्हचा उपयोग करून घेता येईल. इतर मंडळांच्या नव्वदीपार असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहता स्पर्धा थोडी कठीण वाटू शकते. कारण मुंबई विभागाचा विचार केला असता नव्वदीपार विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांहून ५ हजारवर आली आहे. मात्र अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर चित्र स्पष्ट होऊ शकेल.
उज्ज्वल भवितव्याची संधीकृतीपत्रिका आणि बदललेल्या अभ्यासक्रमाचा उपयोग विद्यार्थ्यामधील कौशल्य जाणून घेण्यासाठी होणार आहे. कारण त्याची पुढील अभ्यासासाठीची किती क्षमता आहे, त्याच्यात किती गुणवत्ता आहे, हे मिळणाऱ्या गुणांवरून सिद्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळेच आता दहावीच्या निकालात विद्यार्थ्याला त्याची गुणवत्ता समजल्याने तो त्याप्रमाणे करिअर निवडू शकतो. याच गुणवत्तेच्या आधारे पुढे त्याला उज्ज्वल भवितव्यासाठी चांगली संधी त्याला निश्चितच मिळू शकते.विद्यार्थ्यांच्या निकालात घसरण करणे हा प्रश्नपत्रिकेच्या बदलामागील उद्देश नव्हता तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये गुणात्मक वाढ करणे हा त्यामागचा उद्देश आहे. - शरद खंडागळे