मुंबई : पेट्रोल व डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे राज्यातील नागरिक महागाईने होरपळून निघाला आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात तर राज्य सरकारने मूल्यवर्धित करात कपात करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०९ डॉलर्स प्रति बॅरलवरून थेट ४५ डॉलर्सपर्यंत गेल्यानंतरही केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किरकोळ विक्री दरात त्या तुलनेत कपात केली नव्हती. उलटपक्षी अनेकदा उत्पादन शुल्क वाढवून महागाईत वाढ केली. त्यामुळे आता केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत.महाराष्ट्रात होणाऱ्या पेट्रोल विक्रीतून उत्पादन शुल्काच्या रूपात केंद्र सरकार प्रति लीटर साधारणत: २२ रु. तर मूल्यवर्धित करांच्या रूपात राज्य सरकार प्रति लीटर सुमारे २९ रुपय कमावते आहे. डिझेल विक्रीतूनही साधारणत: याच प्रमाणात करवसुली केली जात आहे.केंद्र सरकारने वस्तू व सेवा कर लागू करताना ‘एक देश, एक कर’ अशी संकल्पना मांडली होती. परंतु, पेट्रोल व डिझेलचा वस्तू व सेवा करात अंतर्भाव न झाल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना प्रत्येक लीटरच्या खरेदीमागे केंद्र व राज्य सरकार मिळून सुमारे ६० टक्के कर भरावा लागतो आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कर कपात करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.
‘पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कपात करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 1:07 AM