वीज वितरण हानी ३ टक्क्यांवर आणा; अन्यथा वेतनवाढ रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 03:35 AM2019-01-11T03:35:18+5:302019-01-11T03:35:35+5:30
ग्राहक तक्रारींबाबत बैठक : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
मुंबई : महावितरणच्या भांडुप परिमंडळ झोनच्या सर्व विभागांतील वीज वितरण हानी येत्या महिन्याभरात पाच टक्क्यांपर्यंत आणा; अन्यथा कर्मचारी अभियंतांच्या तीन वेतनवाढी गोठवण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. भांडुप येथे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा आणि तक्रारींबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी बैठक घेतली. या बैठकीत ग्राहकांना मिळणाºया सर्व सेवा आॅनलाइन झाल्या पाहिजेत. लघुदाब ग्राहकांचे वीज कनेक्शन महिन्याभरात पूर्ण करण्यात यावे, असेही निर्देश त्यांनी दिले.
सुमारे २४ लाखांपेक्षा अधिक ग्राहक असलेल्या भांडुप परिमंडळात दहा टक्के वीज वितरण हानी आहे. ही हानी पाच टक्क्यांवर आली पाहिजे. एकही कृषिपंप कनेक्शन नसताना एवढी हानी नको. वीज वितरण हानी ही तीन टक्क्यांपर्यंत आणण्याचे प्रयत्न करावेत, असे ऊर्जामंत्री म्हणाले. दीनदयाल योजनेत १२० कोटींची कामे झाली असून उर्वरित कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करावीत. ३१ मार्चपर्यंतच्या आर्थिक वर्षात ज्या अधिकाºयांनी दिलेला निधी खर्च केला नाही; त्या संबंधित अधिकाºयांवर कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सर्व कर्मचाºयांच्या मोबाइलमधील जीपीएस सिस्टम सुरू ठेवण्याच्या सूचनाही ऊर्जामंत्र्यांनी दिल्या.
भांडुप झोनमधील २४ लाख ग्राहकांपैकी फक्त ९ लाख ५५ हजार ग्राहकांकडे मोबाइल अॅप आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत सर्व ग्राहकांना मोबाइल अॅपने जोडण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान, ठाणे, कळवा, मुंब्रा येथे सर्वाधिक वीज हानीचे आकडे समोर आले. ज्या भागात महावितरणची वीज अजून पोहोचली नाही; तेथे यंत्रणा कधी पोहोचणार याचे नियोजन करून शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
वीज कनेक्शन प्रक्रिया आॅनलाइन
वीज कनेक्शनसाठी अर्जाची प्रक्रिया आॅनलाइन करावी. सर्कल ते डिव्हिजनमधील कनेक्शनची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण व्हावी. कनेक्शनसाठी ग्राहकांनी महावितरण कार्यालयात येण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले़