मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला जात आहे. तर, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदारबच्चू कडू यांनी अनाथांना आरक्षण देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे गृहनिर्माण संस्थेमध्येही सदनिकांसाठी आमदारांचे 2 पैकी एक टक्का आरक्षण कमी करुन अनाथांना 1 टक्का आरक्षण देण्यासंदर्भात कडू यांनी लक्षवेधी मांडली. त्यावर, उत्तर देताना 1 तारखेला यांसदर्भात बैठक होईल, असे सांगण्यात आल्याचे कडू यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाचा झाल, धनगर बांधवांचं आरक्षण बाकी आहे. सभागृहात आम्ही अनाथांना आरक्षण मिळावं, यासाठी लक्षवेधी मांडली होती.. अनाथांना 1 टक्के आरक्षण देण्यात आलं आहे, पण अद्याप कुणालाही हे आरक्षण मिळालं नाही. कारण, नेमकं अनाथ कुणाला म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे. समांतर आरक्षणामध्ये नोकरीमध्ये अनाथांना कशाप्रकारे आरक्षण द्यावं यासाठीच्या धोरणासंदर्भात एक राज्यस्तरीय समिती गठन करण्याचं मंत्रीमहोदयांनी आश्वासन दिलंय. येत्या 1 जुलै रोजी त्यासंदर्भात बैठक होईल, असे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
अपंग बांधवांसाठी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 3 टक्के आरक्षण देण्यात येतं. मग, त्याचप्रमाणे अनाथांना 1 टक्का आरक्षण देण्यात याव. वयाच्या 21 वर्षानंतर अनाथांनी कुठं जावं, वसतिगृहानंतर त्याला गाव नाही, घर नाही, देशही नाही. त्यामुळे शहरातील ओपन स्पेस असतील, तेथे अनाथांना 1 टक्के आरक्षण द्यावे. तर, गृहनिर्माण संस्थांमध्ये आमदारांना सदनिकांसाठी 2 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, आमदारांचे 1 टक्का आरक्षण कमी करुन, अनाथांना 1 टक्का आरक्षण देण्यासंदर्भात लक्षवेधी विधिमंडळात मांडण्यात आली असून 1 जुलै रोजी त्यासंदर्भात बैठक होईल, अशी माहितीही बच्चू कडू यांनी दिली.