सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाचा आकार कमी ठेवा; मंडळांसाठी महापालिकेची नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 05:53 AM2020-07-12T05:53:10+5:302020-07-12T05:53:49+5:30
मुंबईत सुमारे १२ हजार छोटे-मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या मंडळांकडून शुक्रवारपासून आॅनलाइन अर्ज मागविण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप बांधण्यासाठी आॅनलाइन परवानगी देण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंडळांना हमीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर गणेशमूर्तीची उंची चार फुटांपर्यंत, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन, मंडपात पाचपेक्षा अधिक कार्यकर्त्यांना मनाई आणि दररोज तीन वेळा निर्जंतुकीकरण, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
मुंबईत सुमारे १२ हजार छोटे-मोठे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या मंडळांकडून शुक्रवारपासून आॅनलाइन अर्ज मागविण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गणेशोत्सव काळात संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने काही अटी-शर्तींवर मंडळांना परवानगी दिली आहे.
मात्र मंडळांकडून परवानगीसाठी आकारण्यात येणारे नाममात्र शंभर रुपये शुल्क रद्द करण्यात आले आहे. तसेच यंदा मागील वर्षीच्या आधारे परवानगी मिळणार असल्याने मंडळांना पोलीस आणि अग्निशमन दलाची परवानगी घ्यावी लागणार नाही.
अशी आहे नियमावली
- मंडपात स्थापन करण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीची उंची चार फुटांपेक्षा अधिक असणार नाही. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मंडपाचे आकारमान कमीत-कमी ठेवावे.
- सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे. मंडपात वावरणाºया प्रत्येक व्यक्ती अथवा कार्यकर्त्यांनी मास्क लावणे बंधनकारक असेल. तसेच मंडपात एका वेळी पाचपेक्षा अधिक कार्यकर्ते असणार नाहीत.
- मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करून घेणे. कार्यकर्ते आणि इतर व्यक्तींसाठी सॅनिटायझेशन उपलब्ध करून देणे.
- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रसाद वाटणे, फुले व हार अर्पण करण्यास प्रतिबंध असावा. तसेच गणेश मंडपाच्या परिसरात दरवर्षी लावण्यात येणारे फुले, हार, प्रसाद विक्रीचे तात्पुरते स्टॉल व टेबल यंदा लावू नये.
- आरतीच्या वेळी मंडपात एका वेळी जास्तीत-जास्त १० कार्यकर्त्यांना संधी द्यावी. व्यावसायिक जाहिरातींना प्रतिबंध करून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा.
- गणेशमूर्तीच्या आगमन आणि विसर्जनप्रसंगी मूर्तीबरोबर मंडळाचे १०पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. तसेच कोणतीही मिरवणूक काढली जाणार नाही, याकडे लक्ष द्यावे. सार्वजनिक मूर्तींचे विसर्जन मंडपालगतच्या कृत्रिम तलावातच करावे.
- उत्सवप्रसंगी कोरोना विषाणूचा फैलाव होण्यासारखी कोणतीही कृती करू नये. अन्यथा साथरोग कायदा १८९७, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा २००५ व भारतीय दंड विधान १८६० कायदा अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.