महापालिकेच्या अनुदानाने ‘बेस्ट’ तुटीत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 01:12 AM2019-10-08T01:12:40+5:302019-10-08T01:13:06+5:30
बेस्टचे आर्थिक गणित गेल्या काही वर्षांपासून बिघडले आहे.
मुंबई : जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांत बेस्ट परिवहन विभागाला ८२९.०२ कोटी रुपयांची तूट आली आहे. मात्र वीज विभागाचा १२५.०६ कोटींचा नफा त्यामधून वजा केल्याने ७०३.९६ कोटी रुपयांची तूट निर्माण झाली होती. मात्र महापालिकेने दिलेल्या ६०० कोटींच्या अनुदानामुळे ही तूट १०३.९६ कोटींवर आली आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाला दिलासा मिळाला आहे.
बेस्टचे आर्थिक गणित गेल्या काही वर्षांपासून बिघडले आहे. आर्थिक संकटामधून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाला महापालिकेकडून आर्थिक मदत पुरविण्यात येत आहे. ११३६ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज, ६०० कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेने दिले आहे. असे एकूण २१०० हजार कोटी रुपये दिल्यानंतर महापालिकेच्या मागणीनुसार या रकमेचा वापर कुठे केला? याचा हिशोब बेस्ट प्रशासनाने स्थायी समितीला नुकताच दिला.
त्यानुसार बेस्टला जूनमध्ये - २०६.७७ कोटींची तूट आली होती. तर जुलैमध्ये ही तूट १४९.०२ कोटी रुपये आणि आॅगस्टमध्ये ही तूट ३४८.१७ कोटी रुपये अशी एकूण ७०३.९६ कोटींची तूट आली होती. पालिकेने बेस्टला जूनमध्ये दोनशे कोटी, जुलैमध्ये शंभर कोटी तर आॅगस्टमध्ये ३०० कोटी रुपये असे ६०० कोटींचे अनुदान दिले. यामुळे बेस्टची तूट ७०३.९६ कोटी रुपयांवरून १०३.९६ कोटींवर आली आहे, अशी माहिती यात सादर करण्यात आली आहे.
वेतनासाठी वापरले ४०६ कोटी
बेस्टला पालिकेकडून ६०० कोटींचे अनुदान मिळाले आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन, ग्रॅज्युईटीपोटी बेस्ट उपक्रमाला ९३.७४ कोटी रुपये वापरावे लागले. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी तीन महिन्यांत ४०६ कोटींचा वापर होतो.