‘व्हाइट टॉपिंग’मुळे रस्ते अपघातांच्या प्रमाणात घट - पी. एल. बोंगिरवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:01 AM2020-01-23T03:01:58+5:302020-01-23T03:02:23+5:30
सध्या भारतातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. खड्डे आणि वाईट रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन कित्येक जणांचा मृत्यू होतो.
मुंबई : सध्या भारतातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. खड्डे आणि वाईट रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होऊन कित्येक जणांचा मृत्यू होतो. परंतु रस्त्यासाठी व्हाइट टॉपिंग हे तंत्रज्ञान वापरल्यास २० वर्षे रस्ते खड्डेमुक्त राहतील. व्हाइट टॉपिंगमुळे रस्ते अपघातांच्या प्रमाणात घट होईल, असा दावा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मुख्य सचिव पी. एल. बोंगिरवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
बोंगिरवार म्हणाले, काँक्रिट उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता व्हाइट टॉपिंग रस्ते २४ ते ३६ तासांत पुन्हा वापरासाठी खुले होतात; आणि नव्या, कमी खर्चीक साधनांमुळे रस्त्यांचे काम वेगाने पूर्ण होते तसेच प्रवासही सुधारतो. रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत व्हाइट टॉपिंग आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. कारण रस्त्यांची सुरुवातीची किंमत काहीशी अधिक असली तरी यातून दीर्घ काळासाठी चांगली परिणामकारकता तसेच टिकाऊपणा मिळू शकेल. इतर रस्त्यांप्रमाणे वारंवार दुरुस्ती करण्याची आवश्यकता भासणार नाही. हे रस्ते २० वर्षे आपला दर्जा टिकवून ठेवतात. त्यामुळे रस्त्यांची कामे पाहणारा विभाग व्हाइटटॉप रस्त्यांना पसंती देत आहे. या तंत्रज्ञानामध्ये महानगरांमधील आर्थिक विकासाला गती देण्याची क्षमताही आहे, असे ते म्हणाले.
इंधनासह ऊर्जेची बचत
या तंत्रज्ञानात काँक्रिटचा वापर असल्यामुळे इतर रस्त्यांच्या तुलनेत रात्रीच्या वेळी दृश्यमानता अधिक वाढते. काँक्रिटचे १०० टक्के पुनर्वापर करता येऊ शकते. वाहनांचे १० ते १५ टक्के इंधन वाचते आणि प्रति कि.मी. वाहनांची २० ते ३० टक्के ऊर्जाही वाचते, असे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मुख्य सचिव पी. एल. बोंगिरवार यांनी सांगितले.
व्हाइट टॉपिंग हे तंत्रज्ञान काय आहे?
पारंपरिक पद्धतीने रस्ता बनवताना त्याचे खोदकाम केले जाते. भूपृष्ठावरचा टणक थर खोदून काढला जात होता. व्हाइट टॉपिंग या तंत्रज्ञानात रस्त्यावरून गाड्यांच्या वाहतुकीमुळे टणक झालेल्या पृष्ठभागाचा वापर करतात. रस्त्याचे भूपृष्ठ १०० ते १५० मिमी खरवडून काढल्यानंतर व्हाइट टॉपिंगमध्ये काँक्रिट टाकून फक्त सहा दिवस पाण्याचा मारा देऊन रस्ता सुकवला जातो. सुकवण्याचे हे काम खरेतर तीन दिवसांत होऊ शकते. मुंबईत जड वाहतूक तसेच काही तासांत हजारो वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्याला बळकटी आणण्यासाठी आणखी चार दिवस अशा एकूण सात दिवसांत रस्ता वाहतुकीसाठी खुला होतो.