Join us

मध्य मुंबईत पाणीपुरवठ्यात कपात

By admin | Published: November 03, 2015 3:27 AM

वांद्रे येथे ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी धारावी परिसरासह माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम येथे

मुंबई : वांद्रे येथे ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दिवशी धारावी परिसरासह माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम येथे पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी, नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.उर्ध्व वैतरणा जलवाहिनीवर सहार अँकर ब्लॉक ते स्काडा केबिन वांद्रे येथे चार ठिकाणी जोड करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हे काम सुरू होईल आणि ५ नोव्हेंबर सायंकाळी ४ वाजता पूर्ण होईल. या कालावधीत जी/उत्तर विभागातील धारावी परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. संत रोहिदास चौक, सेनापती बापट मार्ग येथील अस्तित्वात असलेल्या ६०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर ६०० मिलिमीटर व्यासाची झडप बसविण्याचे व १४५० मिलिमीटर तानसा पूर्व व ६०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे छेद जोडकाम हाती घेण्यात येणार आहे. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता हे काम सुरू होईल आणि ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता पूर्ण होईल. या कालावधीत जी/ उत्तर व जी/ दक्षिण विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. (प्रतिनिधी)असे असेल दोन दिवसांचे कपातीचे वेळापत्रक४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेदरम्यान धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, कुंभारवाडा, दादर, माहीम, माटुंगा येथील पाणीपुरवठा बंद राहील. सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेदरम्यान एलफिन्स्टन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल.जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेना भवन परिसर, मोरी मार्ग, टी.एच. कटारिया मार्ग, कापड बाजार, माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम येथील पाणीपुरवठा बंद राहील.५ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ ते सकाळी १० वाजेदरम्यान ९० फुटी रस्ता, संत रोहिदास मार्ग, लूप मार्ग, शास्त्री नगर, शाहू नगर, जास्मिन मिल मार्ग, टी.एच. कटारिया मार्ग, ट्रान्झिस्ट कॅम्प, संत कैकया मार्ग, सायन-माहीम जोड रस्ता, प्रेम नगर, शताब्दी नगर, नाईक नगर, खामदेव नगर, एम.जी. मार्ग, आंध्रा व्हॅली येथील पाणीपुरवठा बंद राहील. पहाटे ४ ते सकाळी ७ वाजेदरम्यान धोबी घाट सात रस्ता येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ या कालावधीत ना.म. जोशी बी.डी.डी. चाळ, ना.म. जोशी मार्ग, महादेव पालव मार्ग या भागात पाणीपुरवठा होणार नाही. सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत धारावी मुख्य रस्ता, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग आणि कुंभारवाडा येथे उशिराने पाणी येईल.