रिल्स एक विलक्षण हत्यार; यातून महाराष्ट्राचं प्रबोधनही झालं पाहिजे - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 09:38 PM2023-08-01T21:38:57+5:302023-08-01T21:44:08+5:30
यानिमित्त मनसेकडून महाराष्ट्र नवनिर्माण रील बाझ (Reel Baaz) पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
मुंबई : रिल्स एक विलक्षण हत्यार आहे. हे तुमच्या हातात आहे. यातून महाराष्ट्राचं प्रबोधन झाले पाहिजे, कारण हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला १७ वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त मनसेकडून महाराष्ट्र नवनिर्माण रील बाझ (Reel Baaz) पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात राज ठाकरे बोलत होते. यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे देखील उपस्थित होते.
महाराष्ट्र विद्यार्थी सेनेला आज १७ वर्ष झाली. Reel Baaz पुरस्कार सोहळा आज आयोजित करण्यात आला. मला वाटते महाराष्ट्रातील डान्सबार जेव्हा बंद झाले. त्यावेळी लागलेली सवय ती या रिल्सच्या माध्यमातून पूर्ण झाली. एकएकटे बसलेले असतात, काय सुरू आहे काही कळत नाही. माझ्या नजरेत काही जण येतात. त्यांची अप्रतिम समयसुचकता असते. रिल्समधून समाज प्रबोधन झाले पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.
आशाताई भोसले यांचा माझ्या हस्ते सत्कार होता. त्यावेळी मी एक गोष्ट सांगितली होती. तुम्ही किती महत्वाचे काम करता, याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी. पाकिस्तानचे अनेक कलाकार इथं येतात. आपल्याकडे जे लेखक झाले, कलाकार झाले ही विविध अंगांमध्ये तुम्ही देखील येता म्हणजे रिल्स, संपूर्ण समाज गुंतवून टाकण्याची ताकद तुमच्यात आहे. आज समाज शांत आहे, कारण सगळं श्रेय तुमचे आहे. राजकारण ज्या खालच्या स्तरावर गेले त्या स्तरावर तुम्ही जाऊ नका, असे राज ठाकरे म्हणाले.
याचबरोबर, हा कार्यक्रम सुरू असताना मी आत बसलो होतो. त्यावेळी अमित ठाकरेंबाबत घोषणा देण्यात येत होत्या. अमित ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है...! बाकीच्या भंगारमध्ये मी तर नाही येत नाही, अशी मिश्कील टीप्पणी राज ठाकरेंनी केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. तसेच, मी जास्त बोलणार नाही कारण अमितने मला सांगितले होते. तो म्हणाला ये आणि दोन मिनिटं बोल घरच्यांच्या विरोधात मी जास्त बोलत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.