मुंबई : चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या (बीपीसीएल) रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लँटमध्ये बुधवारी दुपारी भीषण स्फोट होऊन माहुल गावासह चेंबूर, वडाळा, सायन-प्रतीक्षा नगर आणि गोवंडी, मानखुर्दचा परिसर हादरला. स्फोटांनंतर लागलेल्या आगीत ४५ जण जखमी झाले. या परिसरात अनेक कारखाने आणि दाट लोकवस्ती आहे. स्फोटाची तीव्रता आणि त्यानंतर भडकलेल्या आगीचा वणवा वेळीच आटोक्यात आला नसता तर मोठी जीवीतहानी झाली असती.मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूरसह लगतच्या परिसरात रासायनिक खते आणि तेलकंपन्या असून, येथील परिसर ‘हेवी इंडस्ट्रीयल झोन’ घोषित आहे. मोनो रेलचा मार्गही येथूनच जातो. याच परिसरात बीपीसीएलच्या रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लँट आहे. दुपारी तीनच्या सुमारास तेथे भीषण स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर हादरला. घटनास्थळी आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट पसरले. अग्निशमन दलाने सुरुवातीला नऊ फायर इंजिन, एक जेटी, चार रुग्णवाहिका, घटनास्थळी आल्या. आगीचे भीषण रुप लक्षात घेऊन नंतर पंधरांहून अधिक बंब घटनास्थळी पाठवले. सुरक्षेसाठी सर्व प्लँट बंद करण्यात आले होते. दुर्घटनेत जखमी झालेल्या २२ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले, तर १९ जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 72 टन हायड्रोकार्बनचा वापर ही आग नियंत्रणात आणण्यासाठी केला.>सर्वात मोठी रिफायनरीबीपीसीएल कंपनी ही भारत सरकारच्या अधिपत्याखाली काम करते. मुंबईत बीपीसीएलचं मुख्यालय आहे. बीपीसीएल कंपनी ही तेल आणि गॅस निर्मिती करणारी कंपनी आहे. बीपीसीएलच्या मुंबई आणि कोचीनमध्ये सर्वात मोठ्या रिफायनरी आहेत. सध्या बीपीसीएलचे डी. राजकुमार हे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.>आग पुन्हा भडकणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असून, घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आहे, तर दुर्घटनास्थळावरून कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.- प्रभात रहांगदळे, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख