Join us

Refinery Project: 'कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच...'; ठाकरे गटाच्या आमदाराने केलं ट्विट 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 11:26 AM

Refinery Project: बारसूमधील रिफायनरीच्या प्रकल्पावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मुंबई/रत्नागिरी: आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर बारसूमधील रिफायनरी प्रकल्पाच्या परिसरातील वातावरण शांत झाले आणि सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करण्याचे काम प्रथम हाती घेण्यात आले. बहुतांश लोकांना ताब्यात घेतल्यानंतर दुपारी अत्यंत कमी आंदोलक बारसूच्या माळरानावर होते. झाडाच्या सावलीचा आधार घेत ते तेथेच बसून आहेत. मात्र वातावरण निवळले असल्याने सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

बारसूमधील रिफायनरीच्या प्रकल्पावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारच्या भूमिकेवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राज्यातील महत्वाच्या सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेत आहे. आज उदय सामंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेणार आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या ट्विटची चर्चा रंगली आहे. 

राजन साळवी यांनी आज ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच....माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी, त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी राजन साळवी यांनी केली आहे. तसेच राजन साळवी यांनी मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे यांचे ट्विटवर अकाऊंट आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेन्शन केले आहे.

ग्रामस्थांनी केलेल्या विरोधामुळे वातावरण खूप तणावपूर्ण झाले होते. सकाळी ८ वाजल्यापासून पोलिस आणि इतर अधिकार्यांच्या गाड्या ग्रामस्थांनी अडवल्या. त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना रत्नागिरी जिल्हा मुख्यालयात नेण्यात आले. हे सर्वेक्षण नेमके किती दिवस चालेल, याची कोणतीच माहिती नसल्याने आणखी काही दिवस पोलीस बंदोबस्त तेथे कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

सगळ्या शंकाचे निरसन केले जाईल-

आपल्या सगळ्या शंकाचे निरसन केले जाईल. आपण शांतता ठेवून प्रशासनाला त्यांचे काम करण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी देवेंदर सिंह यांनी केले. आपल्या शंका, प्रश्न यांचे निरसन करण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण केले जाईल. यावर प्रकल्प विरोधकांनीही सहकार्याची भूमिका घेतली. आता यासाठी गुरुवारी (दि. २७) राजापुरात प्रांताधिकारी कार्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सर्व प्रकल्प विरोधी स्थानिक ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ग्रामस्थांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाणार आहे. त्यात तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता, असे सांगतानाच ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी एम. देवंदर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :एकनाथ शिंदेरत्नागिरीराजन साळवीमहाराष्ट्र सरकार