'फोर स्टोरीज'मधून उमटले संवदेनशील मनाचे प्रतिबिंब; मुंबईत 5 सप्टेंबरपर्यंत चित्रप्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 07:31 PM2022-08-31T19:31:12+5:302022-08-31T19:49:42+5:30

जहांगीर आर्ट गॅलरीत रंगला उद्घाटनाचा सोहळा, पाच सप्टेंबरपर्यंत चित्रप्रदर्शन

Reflections of a sensitive mind from 'Four Stories' in jahangir art gallery of mumbai | 'फोर स्टोरीज'मधून उमटले संवदेनशील मनाचे प्रतिबिंब; मुंबईत 5 सप्टेंबरपर्यंत चित्रप्रदर्शन

'फोर स्टोरीज'मधून उमटले संवदेनशील मनाचे प्रतिबिंब; मुंबईत 5 सप्टेंबरपर्यंत चित्रप्रदर्शन

Next

मुंबई - चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण नसले तरी ह्रदयातील सच्च्या भावनेचे प्रतिबिंब फोर स्टोरीज मधील चित्रांतून उमटताना दिसते. त्यामुळेच ती केवळ चित्र नसून ती विचारांची, संवेदनशीलतेची एक अनुभुती आहे. त्याचा रसास्वाद कलासक्त व्यक्तीने घेणे महत्वाचे आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. कोरोना महामारीच्या काळात भवतालच्या स्तब्धतेने, वेदनेने व्यथित झालेल्या चार चित्रकारांनी त्यांच्या मनातील भावनांना रंगाद्वारे वाट मोकळी करून दिली, त्याच उत्कट चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी राज्यपालांच्या हस्ते जहांगीर आर्ट गॅलरी येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

मुंबई आर्ट एक्सप्रेशन्सच्या संस्थापक तृप्ती जैन यांच्या समन्वयातून, लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा, सर्च संस्थेच्या मुख्य वास्तुविशारद जयश्री भल्ला, छायाचित्रकार रचना दर्डा, कलाकार बिना या चौघांनी रेखाटलेली चित्रे फोर स्टोरीज या प्रदर्शनाच्या माध्यमातून सादर करण्यात आली आहेत. या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाद्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राष्ट्रवादीचे नेते व खासदार प्रफुल्ल पटेल, इस्कॉनचे स्वामी नित्यानंद चरण दास प्रमुख अतिथी होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच या फोर स्टोरीजमागच्या कहाणीचा पट उलगडताना विजय दर्डा म्हणाले की, पत्रकार, संपादक, खासदार आणि एक संवेदनशील व्यक्ती या नात्याने मी समाजात वावरताना जे जे पाहिले, अनुभवले, विशेषतः कोरोनासारख्या भीषण संकटादरम्यान, ते सारे रंगांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या चित्रांद्वारे केला आहे. या चित्राद्वारे केवळ भावविश्वाची मांडणी नाही तर त्यामागे सेवाभावाचा देखील हेतू आहे. त्यामुळेच चित्र विक्रीद्वारे मिळणाऱ्या निधीतून आम्ही सामाजिक बांधलकी जपण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळी आपल्यासोबतच्या अन्य तीन चित्रकारांबद्दल बोलताना विजय दर्डा म्हणाले की, माझी लहान बहिण जयश्री भल्ला यांना निसर्गाची खूप ओढ आहे. त्यांच्या चित्राद्वारे त्यांची ही ओढ प्रतिबिंबित होते. रचना दर्डा यांची चित्रे अत्यंत बारकावे आणि नेटकेपणांनी सजलेली आहेत. तर बीना यांच्या चित्रांतून भाव-भक्तीची अनुभुती येते.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले इस्कॉनचे स्वामी नित्यानंद चरण दास म्हणाले की, हेतू आणि भाव जर चांगले असतील तर त्याचे प्रतिबिंब तुमच्या कलाविष्कारांतून उमटते. याचीच प्रचिती या चारही चित्रकारांच्या चित्रांतून येते. तर, जयश्री भल्ला यांचे पुत्र शांतनू भल्ला यांनी आपल्या आईच्या वतीने मनोगत व्यक्त करताना देखील, आईची चित्रकलेची साधना, कटिबद्धता याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विजय दर्डा, तृप्ती जैन, रचना दर्डा, चित्रकार बीना यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर दर्डा कुटुंबातील छोटे सदस्य शनाया दर्डा आणि लोकमत मीडीयाचे व्यवस्थापकीय संचालक देवेन्द्र दर्डा यांनी आभार प्रदर्शन केले.

दरम्यान, कार्यक्रमाला अतिरिक्त पोलिस महासंचालक मिलिंद भारंबे, वरिष्ठ आयआरएस अधिकारी समीर वानखेडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, पोलिस महासंचालक संजयकुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, फसाई प्रमुख प्रीती जैन, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, सौ. प्रीती जैन, खास प्रदर्शनासाठी पॅरिसहून आलेल्या आंतरराष्ट्रीय कलाकार सुजाता बजाज, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, गायक रुपकुमार राठोड, आरपीजी समुहाचे अध्यक्ष हर्ष गोएंका, रेमंड समुहाचे अध्यक्ष गौतम हरी सिंघानिया, बजाज इलेक्ट्रिकल्स चे एमडी आणि सीईओ अनूज पोतदार, के. रहेजा ग्रुपचे चेअरमन संदीप रहेजा, माजी गृहनिर्माण मंत्री सुरेशदादा जैन, माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, रमेशदादा जैन, हाफिज कॉन्ट्रॅक्टर, मॅडिसन अँडर्व्हटायझिंगचे अध्यक्ष सॅम बलसारा, स्मितल जेम्सचे अध्यक्ष किरिट भन्साळी, प्रख्यात चार्टर्ड अकाऊटंट जयेन्द्रभाई शाह, टॉपवर्थ ग्रुपचे अध्यक्ष अभय लोढा, जागरण व मिड डे ग्रुपचे संचालक शैलेश गुप्ता, मिल्टन चे व्यवस्थापकीय संचालक अजय वाघानी, एस्सेल ग्रुपचे अशोक गोयल, उद्योजक विजय कलंत्री, उद्योजक विवेक जाधव, गुंतवणूक सल्लागार केतन गोरानीया, प्रसिद्ध फॅशन डिझायनर शायना एन.सी., रिझर्व्ह बँकेचे संचालक आशुतोष रारावीकर, डॉक्टर केकी तुरेल, ज्येष्ठ श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. जलील परकार, बेरियाट्रिक सर्जन डॉ. संजय बोरूडे, गॅस्ट्रोइंट्रोलॉजिस्ट डॉ. अमित मायदेव, आय.व्ही.एफ. स्पेशालिस्ट डॉ. नंदिता पालशेतकर, विख्यात नेत्रशल्य विशारद डॉ. तात्याराव लहाने, बालरोगतज्ज्ञ डॉ. गिरिष मैंदरकर, प्रख्यात गायक रूप कुमार राठोड, ज्येष्ठ पत्रकार व नामवंत चित्रकार प्रकाश बाळ-जोशी, सिने-मालिका निर्माते नितिन वैद्य, कलावंत विनोद शर्मा, सूर्यकांत लोखंडे, दीपक शिंदे, नियती शिंदे, ओम धाडकर, संजीव सोनपिपरे, जहांगीर आर्ट गॅलरीच्या सचिव मेनन अशी नामवंताची मांदियाळी या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित होती.

फोर स्टोरीजमधील चित्रांनी राजभवन, विधानभवन सजणार 

या प्रदर्शानात मांडण्यात आलेल्या चित्रांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम ही सामाजिक कार्यासाठी वापरली जाणार आहे, हे विजय दर्डा यांनी आपल्या प्रास्ताविकात जाहीर केले. हाच धागा पकडत राज्यपालांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच, या प्रदर्शनातील चारही चित्रकारांचे एकेक चित्र राजभवनासाठी विकत घेण्याची घोषणा केली. राज्यपालांच्या या कल्पनेला अनुमोदन देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही अशाच प्रकारे चार चित्र घेणार असल्याचे सांगितले.

चौघांच्या चार चित्रछटा
कोरोना काळात घडणाऱ्या घडामोडींनी व्यथित होत विजय दर्डा यांच्यातील संवेदनशील कलाकाराने मनातील विचारांना रंगाद्वारे वाट मोकळी करून दिली. त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे, पत्रकार ते राजकीय नेता या प्रवासात त्यांच्या मनाने टिपलेली विविध स्पंदने त्यांच्या चित्रातील संवेदनेद्वारे त्यांनी बोलकी केली आहेत. 

निसर्गाशी असलेल्या नात्याच्या विविध छटा शोधताना त्याची मानवी जगण्याशी संगती लावत त्याचा भावाशय चित्रातून चितारण्याचा प्रयत्न सर्च संस्थेच्या मुख्य वास्तुविशारद जयश्री भल्ला यांनी केलेला आहे.

-एखाद्या गोष्टीत दडलेले बहुआयामीत्व अत्यंत बारकाईने टिपत ते जसे दिसते अथवा उमजते तसे मांडण्याचा अनोखा प्रयोग छायाचित्रकार रचना दर्डा यांच्या चित्रांतून जाणवतो.

भाव हा भक्तीच्या मार्गावरील पहिला भावबंध. त्यामुळे आकलनाचे अवकाश विस्तीर्ण करण्याची अनुभुती या भावबंधातून येते, ही थीम साकारत त्या भोवती कृष्णभक्ती आणि भक्तीभाव बंध हा गोफ चित्रकार बीना यांनी गुंफला आहे. 

रंगाला छटा सामाजिक बांधीलकीची
-या चित्रप्रदर्शनात लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या सादर होणाऱ्या चित्रांच्या विक्रीद्वारे मिळणारा निधी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शहीद पोलीसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे.

रचना दर्डा यांच्या चित्रांच्या विक्रीद्वारे मिळणारा निधी यवतमाळ येथील मागासवर्गीय मुलांना उच्चदर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी वापरण्यात येणार आहे.

जयश्री भल्ला यांच्या चित्र विक्रीद्वारे मिळणारा निधी कर्जत येथील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार आहे.

बिना यांच्या चित्रांद्वारे मिळणारा निधी सोसायटी फॉर ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट यांच्यामार्फत पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे मेडिकल सेन्टर उभारण्यासाठी खर्च केला जाईल.

(फोटो - सुशील कदम)

Web Title: Reflections of a sensitive mind from 'Four Stories' in jahangir art gallery of mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.