जुहू किनारी रंगीबेरंगी रोषणाईसह वाळूवर सामाजिक संदेशांचे प्रतिबिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 05:44 AM2017-10-31T05:44:31+5:302017-10-31T05:44:38+5:30
साडेचार किलोमीटर लांबीच्या किना-यावर आधुनिक दिवे आणि तंत्राच्या साहाय्याने उभारलेल्या शिडाच्या नौकांच्या आकाराचे दिवे, रंगीबेरंगी छटा व प्रतिकृतींची रोषणाई आणि गोबो प्रोजेक्टर्सच्या माध्यमातून वाळूवर प्रतिबिंबित होणारे सामाजिक संदेश यामुळे जुहू चौपाटीच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
मुंबई : साडेचार किलोमीटर लांबीच्या किना-यावर आधुनिक दिवे आणि तंत्राच्या साहाय्याने उभारलेल्या शिडाच्या नौकांच्या आकाराचे दिवे, रंगीबेरंगी छटा व प्रतिकृतींची रोषणाई आणि गोबो प्रोजेक्टर्सच्या माध्यमातून वाळूवर प्रतिबिंबित होणारे सामाजिक संदेश यामुळे जुहू चौपाटीच्या सौंदर्यात भर पडणार आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सुशोभीकरणामुळे जुहू चौपाटीचे रूपडेच बदलून गेले आहे. सोमवारी सायंकाळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, आमदार अनिल परब, अमित साटम यांच्यासह पालिकेतील नगरसेवक, अधिकारी आदी मंडळी उपस्थित होते.
रोज हजारो देश-विदेशी पर्यटक जुहू चौपाटीला भेट देत असतात. गेल्या वर्षी महापालिकेने
जुहू चौपाटीच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला
होता. त्यानुसार या प्रकल्पाची पूर्तता करण्यात आली. जुहू चौपाटीला
१२ मीटर उंचीचे १०० खांब बसवण्यात आले. प्रत्येक खांबावर साडेचार
मीटर उंचीवर ‘टेन्साइल फॅब्रिक’पासून तयार केलेल्या शिडाच्या नौकेची प्रतिकृती बसवण्यात आली. या शिडाच्या नौकेच्या खालच्या बाजूने चार दिवे लावण्यात आले आहेत. हे दिवे चौपाटीवर प्रकाशासाठी बसवण्यात आले असून त्यांचे रंग बदलून विविध रंगछटामध्ये दिवे प्रकाशमान होतील. होडीच्या शिडामध्येही मंद प्रकाश देणारे दिवे बसवले गेले आहेत. खांबावर ‘गोबो प्रोजेक्टर्स’ लावण्यात आले असून त्यांच्या मदतीने भरतीच्या पाण्यावर किंवा वाळूवर सामाजिक संदेश देण्यात येणार आहेत. या खांबांचा व शिडाच्या नौकेचा आकार हा चौपाटीवरच्या हवेच्या वेगाला अनुरूप आहे. जुहू चौपाटीवरील पोलीस चौकीजवळ विद्युत रोषणाईने प्रकाशमान होणारे व रंग बदलणारे ‘मीडिया ट्री’ देखील सुशोभीकरणांतर्गत बसविण्यात आले आहेत. तसेच जुहू चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व त्या भोवतालचा परिसरात आकर्षक व अत्याधुनिक स्वरुपाची विद्युत रोषणाई करण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.
रोषणाईला आवाज फाउंडेशनचा विरोध
जुहू चौपाटीचे सुशोभीकरण आणि विद्यूत रोषणाईस आवाज फाऊंडेशनने विरोध केला आहे. कारण कृत्रिम विद्युत रोषणाईच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये हार्मोनल चेंजेस होतात, झोप नाहीशी होते, एकाग्रता नष्ट होते, कृत्रिम विद्यूत रोषणाईमुळे मोठ्या प्रमाणात प्रकाशाचे प्रदूषण होते, असा दावा आवाज फाऊंडेशेनच्या संचालिका सुमैरा अब्दुलाली यांनी केला आहे. त्यामुळे सुशोभिकरणाचे योग्य धोरण ठरवावे, अशी मागणी अब्दुलाली यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.