सारा म्हणाली, “आई मला एखादी जादू शिकव ना. मी उद्या मैत्रिणींना करून दाखवीन.”
आई म्हणाली, “घेऊन ये एक पेन्सिल. एक काचेचा ग्लास आणि एक काचेची मोठ्या तोंडाची बाटली. मी आणते पाणी.”
आईने अर्धा ग्लास पाण्याने भरला आणि ग्लासात पेन्सिल तिरकी ठेवली.आता पाण्यात बुडालेली पेन्सिल मोडलेली आणि जाड पण दिसू लागली.पेन्सिल ग्लास मधून बाहेर काढली की पुन्हा पहिल्यासारखी!आईने काचेची मोठ्या तोंडाची बाटली पाण्याने अर्धी भरली.ग्लासातली पेन्सिल काढून बाटलीत तिरकी ठेवली आहे.
आईने विचारलं, “काय फरक दिसतो?‘ बाटलीतली पेन्सिल अधिक जाड दिसते की ग्लासातील पेन्सिल?दोन्ही ठिकाणी पेन्सिल मोडलेली दिसते पण दोन्ही ठिकाणच्या जाडीत फरक आहे.”असं का होतं..
प्रकाश नेहमी एका सरळ रेषेत प्रवास करत असतो. आणि प्रत्येक माध्यमात त्याची प्रवास करण्याची गती ही वेगवेगळी असते. त्यामुळेच एका माध्यमातून दुसर्या माध्यमात प्रवेश करताना प्रकाश किरणांची दिशा बदल असते. ते वाकतात. पेन्सिलीच्या वरील भागातून येणारे किरण हे हवेतून येतात तर तिच्या खालील भागातून येणारे किरण हे पाण्यातून येत असतात.
किरणांच्या गतीतील फरकांमुळे खालील किरण वाकडे होऊन डोळ्यांकडे येतात. हे येणारे प्रकाश किरण वाकल्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष पेन्सिल असते त्यापेक्षा किंचित मोडल्यासारखी वाटते.
ग्लासाची गोल काच आणि पाणी यामुळे पेन्सिलीपासून येणारे प्रकाश किरण भिंगातून आल्याप्रमाणे पसरतात. यामुळेच पेन्सिल आपल्याला जाड दिसते. ग्लास आणि बाटली यांची गोलाई व काचेची जाडी भिन्न असल्याने, पेन्सिलीची जाडी कमी-जास्त दिसते.
गंमत जंमत
प्राचीन काळी हुनान प्रांतातातील मुलांनी हा प्रयोग तपासून पाहण्यासाठी बांबूच्या काड्या, लाकडाच्या पट्ट्या, सुकलेलं गवत वापरुन पाहिलं आणि त्यांना कळलं हे दिसतं तसं नाही आणि ही जादू ही नाही. तेव्हापासून ‘जे दिसतं तसं नसतं, तेच तर शोधायचं असतं’ ही चिनी म्हण रुढ झाली आहे.- राजीव तांबे
rajcopper@gmail.com