‘राजावाडी’त कैद्याला आश्रय
By admin | Published: May 6, 2016 02:55 AM2016-05-06T02:55:22+5:302016-05-06T02:55:22+5:30
पालिका प्रशासनाला न कळविताच आॅर्थर रोड तुरुंगातील एका कैद्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात तब्बल चार महिने आश्रय देण्यात आला आहे़ याचे तीव्र पडसाद सार्वजनिक
मुंबई : पालिका प्रशासनाला न कळविताच आॅर्थर रोड तुरुंगातील एका कैद्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात तब्बल चार महिने आश्रय देण्यात आला आहे़ याचे तीव्र पडसाद सार्वजनिक आरोग्य समितीच्या बैठकीत आज उमटले़ यासाठी जबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई होईपर्यंत समितीचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देत सभेचे कामकाज तहकूब करण्यात आले़
शेखर चंद्रशेखर हा आरोपी गेले चार महिने राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहे़ याबाबत रुग्णालयाचे प्रमुख डॉ़ अविनाश सुपे यांनाही माहीत नसल्याची धक्कादायक बाब आरोग्य समितीच्या बैठकीत आज उघडकीस आली़ राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ़ सईदा खान यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे ही बाब उजेडात आणली़ तुरुंग प्रशासनाच्या आॅर्डरवरही कोणाचा सही व शिक्का नसल्याने ही आॅर्डरच बनावट असल्याचा संशय सदस्यांनी व्यक्त केला़
मुंग्या आल्यामुळे
रुग्णालयात दाखल
या कैद्याच्या हात व पायांना मुंग्या येत असल्याचे सांगून त्याला पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ ही बाब आयुक्त अजोय मेहता यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले, अशी माहिती शिवसेनेच्या नगरसेविका डॉ़ शुभा राऊळ आणि शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली़
डॉक्टरांच्या निलंबनाची मागणी
रस्ते घोटाळा प्रकरणात अभियंत्याला तत्काळ निलंबित करण्यात आले त्याप्रमाणे या प्रकरणात जबाबदार राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ़ विद्या ठाकूर आणि उपनगरीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ़ महेंद्र वाडीवाला यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेने आयुक्तांकडे केली आहे़ (प्रतिनिधी)
पालिका प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता या आरोपीला चार महिने रुग्णालयात ठेवण्यात आले आहे़ आर्थिक संगनमताशिवाय हा प्रकार घडू शकत नाही़ या प्रकरणाची चौकशी करताना आर्थिक संगनमताचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम यांनी केली़