विक्रीकर विभागातर्फे म्हाडाला ८३ लाखांच्या कर वसुलीचा परतावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 07:30 PM2023-10-17T19:30:33+5:302023-10-17T19:30:56+5:30
आर्थिक वर्ष २००१ -२००२ दरम्यान विक्रीकर विभागातर्फे तत्कालीन बॉम्बे सेल्स टॅक्स कायद्यानुसार ९४ लाख रूपयांचा विक्रीकर 'म्हाडा'कडून वसूल करण्यात आला.
मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) विक्रीकर विभागातर्फे ८३ लाख ९५ हजार रुपयांच्या कर वसुलीचा परतावा नुकताच करण्यात आला आहे. 'म्हाडा'ने केलेल्या अर्ज विक्री, निविदा अर्ज विक्री आणि इतर तत्सम अर्जांच्या विक्रीकरिता विक्री कर अदा केला नसल्याचा ठपका ठेवत विक्रीकर विभागातर्फे सुमारे ९४ लाखांचा कर म्हाडाकडून आकारण्यात आला होता.
आर्थिक वर्ष २००१ -२००२ दरम्यान विक्रीकर विभागातर्फे तत्कालीन बॉम्बे सेल्स टॅक्स कायद्यानुसार ९४ लाख रूपयांचा विक्रीकर 'म्हाडा'कडून वसूल करण्यात आला. मात्र, सदर बाबत म्हाडाने विक्रीकर विभागाच्या आयुक्तांकडे अपील सादर केले. यामध्ये आपले म्हणणे मांडताना 'म्हाडा'ने सादर केले की, अर्ज प्रिंटर / मुद्रकाकडून छापून घेतेवेळी, छपाईच्या रकमेवर मुद्रकास देयकासह विक्रीकर अदा केले होते.
अशाप्रकारे पुनर्विक्री करण्यात आलेल्या अर्जांवर दुसर्यांदा विक्रीकर लागू करण्याची कायद्यात तरतूद नसल्याचे म्हाडाने विक्रीकर विभागाच्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. विक्रीकर न्यायाधिकरणातर्फे २०१९ मध्ये म्हाडाच्या बाजूने निर्णय देत कराची रक्कम म्हाडास परत देण्याचा निर्णय घोषित करण्यात आला.