बुकिंग सुरू झाले की रिफंड देणार; गो-फर्स्टचा ग्राहकांसाठी प्रस्ताव, ९८ टक्के पैसे दिल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 10:01 AM2023-06-08T10:01:39+5:302023-06-08T10:02:38+5:30
आर्थिक गर्तेत अडकल्यामुळे ३ मेपासून जमिनीवरच असलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या विमानांचे बुकिंग केलेल्या ग्राहकांना तातडीने पैसे परत मिळण्याची चिन्हे नाहीत.
लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आर्थिक गर्तेत अडकल्यामुळे ३ मेपासून जमिनीवरच असलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या विमानांचे बुकिंग केलेल्या ग्राहकांना तातडीने पैसे परत मिळण्याची चिन्हे नाहीत. कारण, नवीन बुकिंग झाल्यावरच कंपनीने ग्राहकांचे पैसे परत करू, असा मुद्दा नागरी विमान महासंचालनालयाला (डीजीसीए) दिलेल्या प्रस्तावात मांडल्याचे समजते. मात्र, त्याचवेळी आतापर्यंत ९८ टक्के बुकिंगचे पैसे परत केल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीची विमान सेवा बंद झाल्यानंतर कंपनीने नवीन तिकीट विक्री तातडीने बंद करावी, तसेच ज्या प्रवाशांनी कंपनीच्या विमानसेवेचे बुकिंग केले होते त्यांना त्यांचे पैसे परत करावे, असे निर्देश डीजीसीएने दिले होते. त्यानुसार कंपनीने बुकिंग बंद केले. मात्र, विमान तिकिटाचे आगाऊ बुकिंग केलेल्या अनेक ग्राहकांना त्यांच्या तिकिटाचे पैसे अद्याप मिळाले नसल्याचे समजते. उड्डाणाची परवानगी पुन्हा मिळाली आणि नव्या बुकिंगचे पैसे कंपनीला प्राप्त व्हायला लागले की, आधीच्या प्रवाशांचे पैसे परत करण्याचा पवित्रा कंपनीने घेतला आहे. हे करतानाच, ३ मे नंतरच्या ज्या विमान प्रवासांचे प्रवाशांनी बुकिंग केले होते, अशा ग्राहकांचे पैसे परत करण्यासाठी व्यवस्था केल्याचाही दावा कंपनीने केला आहे.
कंपनीच्या विमानाचे बुकिंग केलेल्या ९८ टक्के ग्राहकांनी ट्रॅव्हल एजंटच्या मार्फत तिकीट बुक केले होते. विमान सेवा स्थगित झाल्यानंतर या ट्रॅव्हल एजंटना पैसे परत करण्यास सुरुवात केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे, तर उर्वरित २ टक्के ग्राहक ज्यांनी कंपनीच्या वेबसाइटवर जाऊन थेट बुकिंग केले, अशा ग्राहकांना मात्र काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे कंपनीच्या पवित्र्यावरून दिसते.
येत्या पाच महिन्यांत २२ विमाने सुरू करण्याची गो-फर्स्टची योजना असून त्यासाठी कंपनीने डीजीसीएकडे प्रस्ताव दाखल केला आहे. याकरिता कंपनीला २०० कोटी रुपयांच्या भांडवलाची गरज आहे.