मंडपाचा आकार वाढवण्यास नकार
By admin | Published: October 6, 2016 04:57 AM2016-10-06T04:57:12+5:302016-10-06T04:57:12+5:30
पूजेदरम्यान महापालिकेने घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याने, उच्च न्यायालयाने बंगाली क्लबला यंदाच्या दुर्गापूजेसाठी महापालिकेने परवानगी दिलेल्या मंडपाच्या
मुंबई : पूजेदरम्यान महापालिकेने घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याने, उच्च न्यायालयाने बंगाली क्लबला यंदाच्या दुर्गापूजेसाठी महापालिकेने परवानगी दिलेल्या मंडपाच्या क्षेत्रफळाव्यतिरिक्त अधिक क्षेत्रफळ वाढवून देण्यास बुधवारी नकार दिला. त्यामुळे बंगाली क्लबला ५० फूट बाय ३५ फूट मंडपातच देवीची मूर्ती बसवावी लागणार आहे.
बंगाली क्लबला दुर्गापूजेसाठी परवानगी देताना महापालिकेने काही अटी घातल्या होत्या. मात्र, आयोजकांकडून या सर्व अटींचे उल्लंघन करण्यात आल्याने, महापालिकेने यंदा आयोजकांना केवळ ५० फूट बाय ३५ फूट मंडप बांधण्याची परवानगी दिली. महापालिकेच्या या निर्णयाविरुद्ध बंगाली क्लबने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ८० वर्षांची दुर्गापूजेची परंपरा असून, या पूजेसाठी दहा हजारांहून अधिक लोक एकत्र येतात. त्यामुळे मंडपाचे क्षेत्रफळ वाढवण्याची आवश्यकता आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
महापालिकेने यावर आक्षेप घेतला. ‘गेल्या वर्षी आयोजकांना मंडपाचा वापर व्यवासायिक कारणाकरिता करण्यास मनाई केली होती, तसेच मंडपात खाद्यपदार्थ शिजवणे, होर्डिंग लावणे, ध्वनिक्षेपकाचा वापर करणे व
वाहने पार्क करण्यास मनाई केली होती. तरीही आयोजकांनी या
सर्व अटींचे उल्लंघन केले.
त्यासाठी आयोजकांना ‘कारणे-दाखवा’ नोटीस बजावली होती, तसेच दोनदा त्यांचे डिपॉझिटही जप्त केले. महापालिका यंदा मंडप बांधण्यास परवानगी देणार नव्हती. मात्र, कोणाच्याही भावना दुखावू नयेत, यासाठी महापालिकेने परवानगीही दिली,’ असे महापालिकेने खंडपीठाला सांगितले.
उच्च न्यायालयाने महापालिकेचा युक्तिवाद ग्राह्य धरत, बंगाली क्लबला मंडपाचे चटईक्षेत्र वाढवून देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)