मुंबई - अंगणवाडी सेविकांना देण्यात येणाऱ्या स्मार्ट फोनच्या खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता. स्मार्ट फोनची बाजारभावापेक्षा अधिक किमतीने खरेदी होत असल्याचा आरोप महिला आणि बालविकास विभागाने फेटाळून लावलेत.
स्मार्ट फोनसोबत मुलांची पोषणविषयक माहिती अपलोड करण्यासाठी मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर, ३२ जीबी डाटाचे एसडी कार्ड, डस्ट प्रूफ पाऊच, स्क्रिन प्रोटेक्टर आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. निविदा प्रक्रियेत मान्य करण्यात आलेली किंमत ही फक्त स्मार्टफोनची नसून ती या सर्व साहित्यांची एकत्रित किंमत आहे, असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
पोषणासंदर्भातील माहिती जलदगतीने उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने राज्यातील अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्मार्टफोनच्या खरेदीची सर्व प्रक्रिया ही जीईएम पोर्टलवर अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली असून त्यानंतर शासनाची राज्यस्तरीय खरेदी समिती आणि उच्च अधिकार समितीच्या मान्यतेने एल १ निविदाधारकास स्मार्ट फोन पुरवठ्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती विभागाने दिली.
या स्मार्टफोनमध्ये अंगणवाडीतील बालकांची तसेच पोषणाची माहिती अपलोड करण्यासाठी आवश्यक असलेले मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट हे सॉफ्टवेअर, माहीती संकलीत करण्यासाठी ३२ जीबी डाटाचे एसडी कार्ड, डस्ट प्रूफ पाऊच, स्क्रिन प्रोटेक्टर आदी साहित्याचा त्यात समावेश आहे. या सर्व साहित्यासह स्मार्टफोनच्या किंमतीस निविदा प्रक्रियेत मान्यता देण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एकूण स्मार्टफोनच्या ५ टक्के अतिरिक्त साठा (बफर स्टॉक) यानुसार ५ हजार १०० एवढे स्मार्टफोन अतिरिक्त घेण्यात आलेले आहेत असे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप हे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून अर्धवट माहितीच्या आधारे करण्यात आलेत असा दावा महिला आणि बालविकास विभागाने केला.
अंगणवाडी सेविकांसाठी खरेदी करावयाच्या सहा हजार रुपये किंमतीच्या मोबाईलची आठ हजार आठशे सत्त्याहत्तर रुपयांनी खरेदी करुन हा घोटाळा करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे