Join us

खंडणी देण्यास नकार देणे बेतले जिवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:06 AM

दहिसरमध्ये फर्निचर कारखाना व्यवस्थापकाची हत्या; चौघांना अटकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहिसरच्या एका फर्निचर कारखान्यातील महेंद्र आर्या (वय ...

दहिसरमध्ये फर्निचर कारखाना व्यवस्थापकाची हत्या; चौघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहिसरच्या एका फर्निचर कारखान्यातील महेंद्र आर्या (वय ५०) या व्यवस्थापकाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी चौघांना अटक केली असून खंडणीसाठी हा प्रकार घडल्याचे चौकशीत उघडकीस आले.

फर्निचर फॅक्टरीत आर्या आणि त्यांचे मित्र विरंगुळा म्हणून पत्ते खेळायचे. १७ मार्च, २०२१ रोजी अभिलेखावरील आरोपी जगदीश जोशी ऊर्फ सूर्या भाई (वय ३६) आणि त्याचे साथीदार राजेश भानसे (३५), सचिन राऊत (३५) व दिनेश ढवळे (३०) तेथे आले. त्यांनी आर्या यांना केलेल्या मारहाणीत ते बेशुद्ध झाले. स्थानिक रुग्णालयाने त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर १८ मार्चला अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, १९ मार्च रोजी कुटुंबीयांना आर्या यांना करण्यात आलेल्या मारहाणीबाबत समजले तेव्हा त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दहिसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाअंती चौघांना अटक केली. जोशी आणि त्याच्या साथीदारांनी आर्या यांच्याकडे खंडणी मागितली होती, ती देण्यास त्यांनी नकार दिल्याने रागाच्या भरात हा प्रकार घडल्याचे चाैकशीअंती समाेर आल्याचे वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदविला असून न्यायालयाने चारही आरोपींना २४ मार्च, २०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

...............................