मुंबई : कामचुकार शासकीय कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने चांगलाच दणका दिला आहे. दुपारच्या जेवणाचा कालावधी दुपारी 1 ते 2 असला तरी आता जेवण अर्ध्या तासात उरकावे असे परिपत्रकच सरकारने जारी केले आहे. यासंदर्भात खबरदारी घेण्याच्या सूचनाही कार्यालय प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ अर्ध्या तासात मंत्रालयातील कँटीनमधून कार्यालयातील खुर्चीत येऊन बसावे लागणार आहे.
सरकारने काढलेल्या परिपत्रकात 21 ऑगस्ट 1988 च्या सरकारी अध्यादेशाचा उल्लेख करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार शासकीय कार्यालयीन वेळेत दुपारच्या भोजनासाठी अर्धा तासाची सुट्टी आहे हे स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरीक शासकीय कार्यालयात आपली गाऱ्हाणी घेवून आले असता अधिकारी, कर्मचारी यावेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सरकारने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाला लावण्याचं काम केलं आहे.
सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी नेहमीच कामात टाळाटाळ करतात. नागरिकांची कामे करण्याऐवजी त्यांच्या कामांना बगल देण्याचंच काम या अधिकारी वर्गाकडून होते. याबाबत सातत्याने नागरिकांकडून तक्रारीही करण्यात येतात. या तक्रारींची दखल घेऊनच सरकारने हे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, मंत्रालयातील कँटीनमध्ये टाईमपास करणाऱ्यांना आता जेवण आटोपतं घ्याव लागणार आहे.