Join us

'सगेसोयरे'संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; मनोज जरागेंनाही केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 3:50 PM

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. 

मुंबई - मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून, आचारसंहिता लागण्यापूर्वी ‘सगेसोयरे अध्यादेश’चा काढतील, अशी आशा आहे. सरकारने तसे न केल्यास आचारसंहितेनंतर सरकारच्या डावाला प्रतिडावाने उत्तर देऊ, असे मत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केले. मात्र, आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सरकारने सगेसोयरे किंवा जरांगे यांच्या मागणीनुसार कुठलाही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सरकारने केलेल्या कामांची आणि निर्णयांची माहिती दिली. यावेळी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. 

आमच्या सरकारने लोकांमध्ये जाऊन काम केलं आहे, घरी बसून आणि फेसबुक लाईव्ह करुन सरकार चालत नसते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मराठा आरक्षणासंदर्भाने मनोज जरांगेंच्या मागणीसंदर्भात प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. 

जरांगेंच्या मागण्यांवर सरकार विचार करत असून सरकारने सगेसोयरेचं नोटीफिकेशन काढले होते. सरकारच्या या नोटीफिकेशनवर ८ लाख ४७ हजार हरकती आल्या आहेत. या हरकतींचा अभ्यास केला जात असून या प्रक्रियेला ४ महिने लागतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. त्यामुळे, मनोज जरांगे यांनीही वस्तूस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे यांनी वडवणी येथील भाषणातून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल करत, भाजपाचा ४८ पैकी एकही जागा निवडून येणार नाही, असा इशाराच दिला आहे. 

सरकारने आज घेतले १७ मोठे निर्णय

निवडणूक आणि आचारसंहितेची घोषणा होण्यापूर्वी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेत मोठे निर्णय घेतले आहेत. आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारने १७ मोठे निर्णय घेतले आहेत. 'राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळाला ५० कोटी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. १३८ जलदगती न्यायालयांसाठी वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळासाठी ५० कोटी भागभांडलीचीही घोषणा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे.

जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल, थेट इशारा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे. सगेसोयरेची व्याख्या लागू करावी यासाठी गेल्या सात महिन्यांपासून मराठा समाजासाठी लढा देत आहे. मात्र, माझ्या विरोधात आपल्याच जातीचे लोक उठले आहेत. जर तुम्ही पक्षाला एवढे मानता तर पक्ष आपल्या मागण्या का मान्य करत नाही, असा सवाल उपस्थित करून पक्षाला नाही तर जातीला बाप माना असा सल्ला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील नेत्यांना दिला. तसेच, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपालाच आव्हान दिलं आहे. तसेच, तुमचा सुफडा साफ होईल, एकही खासदार निवडून येणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले.  

टॅग्स :मराठा आरक्षणमनोज जरांगे-पाटीलएकनाथ शिंदे