Join us

समता नगर सरोवा संकुलातील पाणीटंचाई संदर्भात तोडगा काढण्यासाठी मुंबईत बैठक

By मनोहर कुंभेजकर | Published: July 01, 2024 8:18 PM

या संदर्भात कालच्या लोकमत ऑनलाईन आणि आजच्या लोकमतच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.

मनोहर कुंभेजकर: मुंबई-कांदिवली पूर्वेकडील,समता नगर,ठाकूर कॉलेज समोरील सरोवा म्हाडाच्या पुनर्विकसित संकुलात दि, २५ मार्चपासून पाणीटंचाई आहे. सुमारे २००० घरे असणाऱ्या ३२ मजली इमारतींना मार्च आधी सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास पाणी येत होते. आता मार्च पासून सकाळी आणि संध्याकाळी फक्त १५ ते २० मिनीटे कमी दाबाने पाणी येते. विकासकाकडून उडवाउडवीचं उत्तर मिळत होती. अखेर सहशीलतेचा अंत झाल्यावर काल सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री १०.३० पर्यंत येथील सुमारे एक हजार हुन महिला व नागरिक रस्त्यावर उतरले होते. तर दुपार नंतर येथील नागरिकांनी रास्ता रोको करून येथील रस्ता अडवला होता. तर संतप्त नागरिकांनी येथील बिल्डर एस.डी. कॉर्पोरेशनच्या सेल्स कार्यालयावर धडक मोर्चा नेत आंदोलन केले होते. या संदर्भात कालच्या लोकमत ऑनलाईन आणि आजच्या लोकमतच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते.

आज येथील सरोवा संकुलाच्या पाण्याच्या मीटरची पालिकेच्या आर दक्षिण विभागाच्या जलखात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहाणी केली अशी माहिती समता नगर फेडरेशनने लोकमतला दिली. या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी समता नगर फेडरेशनने उद्या दि,२ जुलै रोजी येथे रात्री ८ वाजता पालिका,पोलिस, म्हाडा यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलवावी असे पत्र एस.डी. कॉर्पोरेशनने समता नगर फेडरेशनला दिले आहे.

याबाबत लोकमतने एस.डी. कॉर्पोरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,येथील इतर भागात पाणी येते,मात्र या संकुलात पाणी येत नाही यात आमचा काही दोष नाही.पालिकेने येथील जलजोडणी व पाणी वितरणात काही फॉल्ट आहे का,याची तपासणी केली पाहिजे.

टॅग्स :मुंबईपाणी