Join us

पक्ष कुठलाही असो, झेंडे येताहेत गुजरातवरून; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झेंडे, मफलरची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 10:50 AM

मागील काही वर्षांत निवडणुकांच्या रिंगणात पारंपरिक प्रचार साहित्यांच्या तुलनेत डिजिटल साहित्यांचा वापर वाढला आहे

मुंबई : मागील काही वर्षांत निवडणुकांच्या रिंगणात पारंपरिक प्रचार साहित्यांच्या तुलनेत डिजिटल साहित्यांचा वापर वाढला आहे. मात्र, तरीही मतदारांवर छाप सोडण्यासाठी, सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी पारंपरिक झेंडे, टोप्या आणि मफलरची मागणी आहे.  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सूरत आणि अहमदाबाद येथे झेंडे, मफलर निर्मितीचे काम वेगाने सुरू आहे. एकीकडे मुंबईचे वैभव गुजरातकडे वळविण्याच्या चर्चा सुरू असताना छोटेखानी उद्योगनही तिथे जात आहेत़. 

मुंबईतील लालबाग मार्केटमध्ये झेंडे, टोप्या, मफलर, बॅच, किचेन, पाॅपसाॅकेट, बिल्ले यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची अनेक दुकाने आहेत. लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच बाजारपेठेतील दुकानांमध्ये राजकीय पक्ष, इच्छुक उमेदवार, उमेदवार आणि पक्ष कार्यालयांकडून अनेक ऑर्डर्स येण्यास सुरुवात झाली आहे. यातील राजकीय पक्षांचे झेंडे विशिष्ट कपडा आणि डिझाइनमध्ये निर्मिती करण्याचे काम सूरत, अहमदाबाद, दिल्ली आणि मथुरा येथील कारखान्यांमध्ये सुरू झाले आहे. याखेरीस, टोप्या, मफलरचे काम मुंबईतील सायन, गोवंडी येथील कारखान्यांमध्ये केले जाते, अशी माहिती लालबाग येथील पारेख ब्रदर्सच्या विक्रेत्यांनी दिली आहे.

मजुरीचे दर कमी असल्याचा परिणाम गेली वीस वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात असणाऱ्या या विक्रेत्यांनी माहिती देताना सांगितले, सूरत, अहमदाबाद या ठिकाणी कामगार सहज उपलब्ध होतात. 

‘यांना’ही मागणी -

१) राजकीय पक्ष, नेते वा चिन्हांचे झेंडे आणि टोप्यांखेरीज पंचे, उपरणी, पदके, कापडी पिशव्या, कार फ्रेशनर, किचेन, पाॅपसाॅकेट, शर्ट, टी-शर्ट, साड्या, बॅच, बिल्ले, मुखवटे, पेन अशा विविध प्रचार साहित्याचा समावेश आहे. 

२)  मागील काही वर्षांच्या तुलनेत आता नव्या मोबाइलच्या ॲक्सेसरीज आणि साड्यांचीही मागणी येत्या काळात वाढेल, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. 

३) या सर्व प्रचार साहित्यांना सध्या बाजारात चांगली मागणी वाढत असली तरी उमेदवारीची नावे जाहीर होताच ही उलाढाल अधिक वाढेल, असेही विक्रेत्यांनी अधोरेखित केले आहे. रॅलीसाठी झेंड्यांनाही मागील वर्षांत मागणी वाढली आहे.

कापडी टोप्यांना विशेष मागणी -

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रचार काळातील उन्हाची तीव्रता डोळ्यासमोर ठेवून कापडी टोप्यांना विशेष मागणी आहे, त्यामुळे या टोप्यांचे काम गोंवडी आणि सायन परिसरातील कारखान्यांमध्ये सुरू आहे. विविध प्रकारच्या टोप्या बनवण्यात आल्या असून त्यावर मनसेचे इंजिन, काँग्रेसचा पंजा, भाजपचे कमळ, राष्ट्रवादीचे घड्याळ, शिवसेना उबाठा गटाची मशाल, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी असे चिन्ह टाकले आहे. या प्रचार साहित्यांची किंमत अगदी पाच रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत आहे, त्यात घाऊक (मोठी ऑर्डर) दिल्यास त्याची किंमत कमी होत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४