मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पासाठी वादग्रस्त ३१ हजार चौ.मी. भूखंडातील काही भूखंड मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (एमएमआरसी) देण्यास रिजेन्सी हॉटेलने नकार दिला आहे. मुंबई विमानतळ प्राधिकरणाने अन्य ठिकाणी तेवढाच भूखंड उपलब्ध करावा किंवा दाव्यावरील सुनावणी जलदगतीने घेऊन हा वाद एकदाच मिटवावा, अशी भूमिका रिजेन्सी हॉटेलने घेतल्याने मेट्रो -३ प्रकल्प रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.एकूण भूखंडापैकी ३१ हजार चौ.मी. भूखंडावर रिजेन्सी हॉटेलने दावा केला आहे. वादग्रस्त भूखंडापैकी १९६ चौ. मी. भूखंडावर एमएमआरसीला व्हेंटिलेशन युनिट उभारायचे आहे. तर १४, ३०४चौ.मी. भूखंड पाच वर्षांसाठी तात्पुरत्या स्वरूपात हवा आहे. त्यामुळे या दाव्यात एमएमआरसीने उच्च न्यायालयात नोटीस आॅफ मोशन काढले. रिजेन्सीच्या वकिलांनी भूखंड देण्यास आक्षेप घेतला. ‘भूखंडासाठी विमानतळ प्राधिकरणाने अर्ज करावा. तसा आदेश उच्च न्यायालयाने यापूर्वी दिला आहे. मात्र विमानतळ प्राधिकरण ही प्रक्रिया वगळून एमएमआरसीला पुढे करीत आहे. ही जागा जनहितासाठी हवे असल्यास अन्य ठिकाणी ३१ हजार चौ.मी. भूखंड अन्य उपलब्ध करून द्यावा. मग आम्ही या जागेवर दावा करणार नाही अन्यथा हा दावा जलदगतीने निकाली काढावा. याच भूखंडावरून एलिव्हेटेड मार्ग जाणार आहे. हा भूखंड दिला तर एलिव्हेटेड प्रकल्पासाठीही भूखंड मागण्यात येईल, असा युक्तिवाद रिजेन्सीने केला. (प्रतिनिधी)
मेट्रो-३ टांगणीवर, भूखंड देण्यास रिजेन्सीचा आक्षेप
By admin | Published: June 22, 2016 3:56 AM