५० टक्के मनुष्यबळ महिलांचे, जागा निश्चित
प्रादेशिक सायबर पोलीस ठाणे लवकरच होणार सुरू
जागा निश्चित : ५० टक्के मनुष्यबळ महिलांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सायबर गुन्हेगारीचा वाढता कल लक्षात घेता, मुंबईत लवकरच प्रादेशिक विभाग स्तरावर पाच नवीन सायबर पोलीस ठाणे सुरू होणार असून, त्याच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात ५० टक्के मनुष्यबळ महिलांचे असणार आहे.
पूर्व प्रादेशिक विभागाचे शिवाजी नगर पोलीस ठाणे, वांद्रे येथील पश्चिम प्रादेशिक विभाग कार्यालय, तर उत्तर विभागाचे समता नगर पोलीस ठाणे, मध्य विभागाचे वरळी पोलीस ठाणे, तर दक्षिण विभागाचे दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस ठाणे या ठिकाणी हे सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार आहेत.
सायबर गुन्ह्याची तक्रार देण्यासाठी तक्रारदाराला बीकेसी येथील सायबर पोलीस ठाणे गाठावे लागते. मात्र, आता प्रादेशिक स्तरावर स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार असल्याने नागरिकांसाठी ते उपयुक्त ठरेल. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक (५), पोलीस निरीक्षक (१५/२०), सहायक निरीक्षक (२०/३०), पोलीस उपनिरीक्षक (३०/५०), अंमलदार (१५०/२००) असे मनुष्यबळ असेल. या पोलीस ठाण्यांवर कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे नियंत्रण असणार आहे.
* तांत्रिक, सायबर ज्ञान असलेल्यांची निवड
सायबर पोलीस ठाण्यामध्ये तांत्रिक तसेच सायबर कायदेविषयक ज्ञान असलेल्यांची निवड करण्यात येणार आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची निवड होईपर्यंत पोलीस निरीक्षकांवर प्रभारी कामकाज सांभाळण्याची जबाबदारी असेल.
...........................................