मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच निकालासंदर्भात पराकोटीचा गोंधळ निर्माण झाला आणि लाखो विद्यार्थांचे नुकसान झाले. मात्र, अद्याप त्यासाठी जबाबदार असलेल्या ‘मेरिट ट्रॅक’ कंपनीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने अतिरिक्त पोलीस आयुक्त यांना नुकतेच पत्र लिहून ‘मेरिट ट्रॅक’ कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन मूल्यांकनाच्या निर्णयामुळे यंदा विद्यार्थी प्रचंड तणावाखालीआहेत. हिवाळी सत्राच्या परीक्षांचे निकाल शंभर दिवस उलटूनही लागलेले नाहीत. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर या आॅनलाइन निकालाचे काम करणाऱ्या आणि निकालासाठी जबाबदार असलेल्या या कंपनीवर कारवाईचे संकेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिले. निकषांच्या आधारित गुणांकडे दुर्लक्ष करत, मुंबई विद्यापीठाने पैसे वाचविण्यासाठी ‘मेसर्स मेरिट ट्रॅक’ कंपनीला काम दिल्याचा तर्क पटण्याजोगा नसून, मुंबई विद्यापीठच्या अतिशय मनमानी कारभारामुळे विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे या कंपनीला हद्दपार करण्यापूर्वी कारवाई करावी, यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने पोलिसांना निवेदन दिल्याचे संघटनेचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी सांगितले.‘मेरिट ट्रॅक’ कंपनीची संपूर्णपणे जबाबदारी असल्याने गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी या वेळी अॅड. मातेले यांनी केली आहे.
‘मेरिट ट्रॅक’ कंपनीवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:01 AM