मुंबई : राज्यातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाची जोरदार कारवाई सुरू असून, गेल्या साडेतीन वर्षांत ३० हजार वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, तर ११ हजार वाहनांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तर दोषींकडून ९६ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती खासगी बसेससह इतर वाहनांचा समावेश आहे, अशी माहिती आरटीओ विभागाने दिली.राज्यामधील प्रवासी वाहतूक करणाºया खासगी बसेसने नियम न पाळल्याच्या अनेक तक्रारी परिवहन कार्यालयाकडे येतात. प्रवाशांची वाहतूक करताना त्यांच्याकडून मोटार वाहन कायदा आणि नियमांतर्गत परवाना आदीविषयक अटींचा भंग होणे, प्रवासी बसेसमधून मालवाहतूक करणे, जादा भाडे आकारणे आदी तक्रारी परिवहन विभागाकडे केल्या जातात. या तक्रारींची राज्याच्या परिवहन आयुक्तांकडून दखल घेण्यात आली. त्यानुसार अवैध वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले होते. या आदेशाचे पालन करत वायुवेग पथक आणि मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडून कारवाई करण्यात येत आहे. एप्रिल २०१६ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान झालेल्या कारवाईमध्ये पथकाकडून वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १,३८,३३४ वाहनांनी नियम न पाळल्याचे आढळून आले.या कारवाईत ३००७७ वाहनांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच या कारवाईअंतर्गत १८,५६३ वाहन चालविण्याचे परवाने आणि ११,७३१ वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या वाहनचालकांकडून ९५ कोटी ९६ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
अवैध वाहतूक प्रकरणी ३० हजार वाहनांची नोंदणी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 3:52 AM