बदलापूर: बदलापूर ग्रामीण भागातील सागाव येथे सहकारी संस्था रजिस्टर करताना बनावट स्वाक्षरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी उल्हासनगर न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या सहकारी संस्थेचे मुख्य प्रवर्तक पदावर आमदार किसन कथोरे असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. न्यायालयाच्या आदेशाची प्रत अद्याप पोलिसांना प्राप्त झालेली नाही मात्र तक्रारदाराकडे ही प्रत आल्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
बदलापूर ग्रामीण येथील 'सागाव परिसर विविध कार्य सेवा सहकारी संस्था' स्थापन करण्यात आली आहे. या सहकारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तक म्हणून आमदार किसन कथोरे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. मात्र ही सहकारी संस्था नोंदणीकृत करताना बनावट स्वाक्षरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थे मध्ये नोंद असलेले काही सदस्य मृत असतानादेखील त्यांची नावे पुढे करण्यात आल्याचा आरोप तक्रारदार प्रभू पाटील यांनी केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा यासाठी पाटील यांनी उल्हासनगर न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्यावर निकाल देताना माननीय न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास संस्थेतील सदस्य अडचणीत सापडणार आहेत. मुख्य म्हणजे या संस्थेच्या सदस्यपदी एमएमआरडीएचे आयुक्त आर ए राजीव यांचे नाव देखील आहे. मात्र त्यांच्या सदस्यत्वासाठी केलेल्या अर्जात खोटी स्वाक्षरी असल्याची कबुली राजीव यांनी या आधीच दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नेमकं वळण कसे लागेल हे चौकशीअंती स्पष्ट होणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात काही तथ्य आढळल्यास सदस्यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर या संदर्भात आमदार किसन कथोरे यांना विचारले असता त्यांनी हे सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणात आपण आपली बाजू योग्य प्रकारे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाही त्यामुळे आत्ता अधिकृत प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.