मुंबई - चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत मुंबई व महामुंबईत रिअल इस्टेट उद्योगात मोठ्या प्रमाणावर तेजीची नोंद झाली आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये ६० हजार ७१९ मालमत्तांच्या व्यवहारांची नोंद झाल्याने ५४ हजार २३९ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या व्यवहारात नागरिकांनी सर्वाधिक ठाणे, डोंबिवली, विरार, मीरा रोड, उलवेला पसंती दिली आहे. चालू वर्षातही मुंबई शहरातील गृह खरेदीचा जोर कायम आहे. मुंबई वगळता महामुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात व्यवहारांची नोंद झाली आहे.
या कारणामुळे घरांच्या विक्रीचा वाढला टक्कामालमत्ता व्यवहारांमध्ये ५० लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरांची टक्केवारी ५१ टक्के आहे तर ५० लाख ते १ कोटी रुपये किमतीच्या दरम्यान विक्री झालेल्या घरांची टक्केवारी ४९ टक्के इतकी आहे. किमान ५०० चौरस फूट आकारमानाच्या घरांचे विक्रीतील प्रमाण ५६ टक्के इतके आहे, तर ५०० चौरस फुटांपेक्षा जास्त आकारमानाच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण ४४ टक्के इतके आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरात विकसित झालेल्या पायाभूत सुविधा तसेच रिअल इस्टेट कंपन्यांनी सर्व गटातील लोकांसाठी सादर केलेल्या गृहनिर्माण प्रकल्पामुळे येथील घरांच्या विक्रीचा टक्का वाढला आहे.
जानेवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत मुंबई वगळता महामुंबई परिसरातील ठाणे, डोंबिवली, विरार, मीरा रोड, उलवे येथे ४६ हजार ६३८ मालमत्तांचे व्यवहार झाले असून, यापोटी एकूण ३९ हजार ७१० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.