गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणीच रद्द होणार! पाहा, प्रकल्पांचा विभागनिहाय तपशील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 12:49 PM2023-11-20T12:49:05+5:302023-11-20T12:49:20+5:30

फेब्रुवारीत नोंदवलेल्या प्रकल्पांनी २० जुलैपूर्वी आणि मार्चमध्ये नोंदवलेल्या प्रकल्पांनी २० ऑक्टोबपर्यंत ही माहिती अद्ययावत करणे आवश्यक होते. 

Registration of housing projects will be cancelled! See section-wise details of projects | गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणीच रद्द होणार! पाहा, प्रकल्पांचा विभागनिहाय तपशील

गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणीच रद्द होणार! पाहा, प्रकल्पांचा विभागनिहाय तपशील

मुंबई : फेब्रुवारीत महारेराकडे नोंदवलेल्या ७०० गृहनिर्माण प्रकल्पांपैकी २४८ प्रकल्पांनी माहिती अद्ययावत केली नाही म्हणून त्यांची नोंदणी स्थगित करण्यात आली असून मार्च मधील ४४३ प्रकल्पांपैकी २२४ प्रकल्पही याच मार्गावर आहेत. जानेवारी - फेब्रुवारी- मार्च; एप्रिल-मे-जून; जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या तीन महिन्यांत किती सदनिका, गॅरेजची नोंदणी झाली, त्यापोटी किती पैसे आले, किती खर्च झाले, इमारत आराखड्यात काही बदल झाला का ? इत्यादी माहिती महारेराकडे सादर करून महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी लागते.

फेब्रुवारीत नोंदवलेल्या प्रकल्पांनी २० जुलैपूर्वी आणि मार्चमध्ये नोंदवलेल्या प्रकल्पांनी २० ऑक्टोबपर्यंत ही माहिती अद्ययावत करणे आवश्यक होते. 
परंतु फेब्रुवारीत नोंदवलेल्या ७०० प्रकल्पांपैकी ४८५ प्रकल्पांना प्रकल्प स्थगितीची नोटीस दिल्यानंतर २३७ प्रकल्पांनी माहिती अद्ययावत केली. माहिती अद्ययावत न करणाऱ्या २४८ प्रकल्पांची नोंदणी स्थगित करण्यात आली आहे. मार्चमधील ४४३ पैकी २२४ प्रकल्पांना माहिती अद्ययावत केली नाही म्हणून प्रकल्प स्थगितीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. या प्रकल्पांनी नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांत माहिती अद्ययावत केली नाही तर त्यांचीही महारेरा नोंदणी स्थगित केली जाणार आहे.

प्रकल्पांची नोंदणीच स्थगित करण्याचा निर्णय महारेराने घेतला असल्याने या प्रकल्पांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्यांना प्रकल्पाची जाहिरात, पणन, सदनिकांची विक्री असे काहीही करता येत नाही. शिवाय या प्रकल्पातील कुठल्याही विक्री व्यवहाराची व साठेखताची नोंदणी न करण्याचे निर्देश महारेराकडून संबंधित उप निबंधकांना दिले आहेत. परिणामी नोंदणीही होत नाही.

बिल्डरला प्रकल्पाची जी माहिती उपलब्ध आहे, तीच सर्व माहिती सार्वजनिकरित्या ग्राहकालाही उपलब्ध असायलाच हवी. ज्यामुळे ग्राहकाला माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह पध्दतीने गुंतवणूकीबाबत निर्णय घेता येईल. गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकास विश्वासार्ह पध्दतीने सेवा देणे, त्याची गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित ठेवणे, तसा आत्मविश्वास त्याला वाटणे ही केवळ महारेराचीच नाहीतर प्रकल्प उभा करणाऱ्या प्रत्येक बिल्डरचीही जबाबदारी आहे. पूर्वीच्या तुलनेत अनेक बिल्डर यात सहकार्य करत आहेत. परंतु अद्यापही अनेक बिल्डर याबाबत गंभीर नाहीत. उदासीनता महारेरा खपवून घेणार नाही.
- अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा

स्थगित प्रकल्पांचा विभागनिहाय तपशील
१) मुंबई महानगर कोकणासह - ठाणे ३९, पालघर १९, रायगड १४, मुंबई उपनगर १३, मुंबई ७ : एकूण ९९
२) पश्चिम महाराष्ट्र - पुणे ४८, सातारा ९, कोल्हापूर ४, सोलापूर ३, सांगली ३ : एकूण ६९
३) उत्तर महाराष्ट्र - नाशिक २३, अहमदनगर ४, धुळे १ : एकूण २८
४) विदर्भ - नागपूर ३१, अमरावती ३, चंद्रपूर, अकोला प्रत्येकी २, वर्धा, बुलडाणा प्रत्येकी १ : एकूण ४०
५) मराठवाडा - संभाजीनगर ८, जालना, बीड प्रत्येकी १ : एकूण १०
६) दमण २

Web Title: Registration of housing projects will be cancelled! See section-wise details of projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.