प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेची टपाल विभागात नोंदणी

By स्नेहा मोरे | Published: March 10, 2024 07:59 PM2024-03-10T19:59:14+5:302024-03-10T19:59:41+5:30

Pradhan Mantri Surya Ghar Yojana: विजेच्या बाबतीत देशातील नागरिकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना’ हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत घरावर सौरऊर्जा पॅनेल उभे करण्यासाठी केंद्र सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य देणार आहे.

Registration of Pradhan Mantri Surya Ghar Free Power Scheme with Postal Department | प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेची टपाल विभागात नोंदणी

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेची टपाल विभागात नोंदणी

मुंबई - विजेच्या बाबतीत देशातील नागरिकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना’ हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत घरावर सौरऊर्जा पॅनेल उभे करण्यासाठी केंद्र सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य देणार आहे. या योजनेच्या माध्यमातून घरगुती वीज निर्मितीला चालना देण्याचा सरकारचा मानस असून त्याद्वारे पर्यावरण अनुकूल वीज निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे. ‘प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वेक्षण आणि नोंदणीची जबाबदारी भारतीय डाक विभागाला देण्यात आली आहे.

डाक विभागातील पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक घरोघरी जाऊन मोफत वीज योजनेची माहिती नागरिकांना देत आहेत. भारतीय डाक विभाग हा देशातील प्रत्येक गाव खेड्यांपर्यंत आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत असल्याने या योजनेचा सर्वदूर प्रचार होण्यास मदत होणार आहे. योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न होणारी वीज नागरिक महावितरणला विकू शकणार आहेत. या योजनेमुळे नागरिक विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधनसुद्धा उपलब्ध होणार आहे. ‘प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने’चे सर्वेक्षण डाक विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन करणार आहेत, विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असून नागरिकांनी नोंदणीसाठी डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कुटुंबांना अनुदान
‘प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजने’अंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवणाऱ्या कुटुंबाला दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ३० हजार रुपये; तर तीन किलो वॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

योजनेचे निकष
- नोदणी करणाऱ्या व्यक्तीचे स्वतःचे घर व वीज जोडणी आवश्यक आहे.
- सोलर पॅनेलसाठी पुरेशी जागा असावी.
- वीजमीटर स्वतःच्या नावावर असावे.

Web Title: Registration of Pradhan Mantri Surya Ghar Free Power Scheme with Postal Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.