Join us

सोनोग्राफी केंद्रांची नोंदणीही ऑनलाइन होणार - टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 9:17 AM

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या कार्यालयात आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते पीसीपीएनडीटीच्या ऑनलाइन वेब पोर्टलचे लोकार्पण झाले

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान (पीसीपीएनडीटी)च्या ऑनलाइन वेबपोर्टलमुळे सोनोग्राफी केंद्रांच्या नोंदणी किंवा नूतनीकरण प्रक्रियेत गतिमानता आणि पारदर्शकता येणार आहे. या  सुविधेमुळे केंद्रधारकांना कार्यालयातील हेलपाटे, अनावश्यक वेळ आणि खर्चापासून दिलासा मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या कार्यालयात आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते पीसीपीएनडीटीच्या ऑनलाइन वेब पोर्टलचे लोकार्पण झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक अर्चना पाटील, सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्याधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. या वेळी राजेश टोपे म्हणाले की, राज्यात मुलांमुलींची संख्या समान राहावी यासाठी राज्य सरकार प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान (पीसीपीएनडीटी) कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करीत आहे. नव्या पोर्टलमुळे प्रलंबित प्रकरणांची माहिती मिळवून संबंधित प्रकरणे निकाली काढण्यास मदत होणार आहे. ही नवीन प्रणाली विकसित केल्याबद्दल आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, या वेब पोर्टलद्वारे नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे. ही प्रणाली  चुकीच्या पद्धतींवर अंकुश ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

टॅग्स :राजेश टोपेडॉक्टरआरोग्य