मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे देशभरातील भटके विमुक्त, तृतीयपंथी, अपंग तसेच गणिका यांची मतदार नोंदणी केली जाणार आहे. या मोहिमेची सुरुवात येत्या ९ नोव्हेंबर रोजी पुण्यातून होणार असून केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त उपस्थित राहणार आहेत. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यानच १ नोव्हेंबर २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण आणि तरुणींचीही मतदार म्हणून नोंदणी केली जाणार आहे. १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांचे या मोहिमेवेळी अर्ज मागवून घेतले जाणार आहेत. राज्यात जानेवारी २०२२ अखेर ९ कोटी १३ लाख ४२ हजार ४२८ मतदार होते. त्यामध्ये ४ कोटी ७७ लाख १७ हजार ७९७ पुरुष, ४ कोटी ३६ लाख २१ हजार महिला तर ३ हजार ५२० तृतीयपंथी मतदार होते.
जानेवारीत अंतिम यादी
सर्वसाधारण महिला आणि पुरुष यांच्यासाठी महिन्याचे दोन शनिवार आणि रविवार तर भटके विमुक्त, तृतीयपंथी, अपंग, गणिका यांच्यासाठी दोन शनिवार आणि रविवारी नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर ५ जानेवारी २०२३ रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल.