प्लेटलेटस दात्यांची नोंदणी
By admin | Published: October 1, 2015 11:38 PM2015-10-01T23:38:45+5:302015-10-01T23:38:45+5:30
डेंग्यूची साथ पसरल्यावर शहरात रुग्णांना प्लेटलेट्सची कमतरता भासते. कर्करोग झालेल्या रुग्णांना तर उपचारादरम्यान अनेकदा प्लेटलेट्स लागतात
मुंबई : डेंग्यूची साथ पसरल्यावर शहरात रुग्णांना प्लेटलेट्सची कमतरता भासते. कर्करोग झालेल्या रुग्णांना तर उपचारादरम्यान अनेकदा प्लेटलेट्स लागतात. कर्करोग रुग्णांच्या प्लेटलेट्स सातत्याने कमी होतात. यावर उपाययोजना म्हणून टाटा मेमोरियल रुग्णालयात पाच वर्षांपूर्वी सुरू केलेला अनोखा उपक्रम आता संपूर्ण मुंबई शहरात राबवला जाणार आहे. त्यासाठी मुंबईत प्लेटलेट्स डोनर नोंदणी करण्यात येत आहे.
टाटा मेमोरियल सेंटर, नरगिस दत्त मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, इम्पॅक्ट फाउंडेशन आणि जी.जे. कपूर फाउंडेशनने मिळून ‘सेव्ह द लाइफ’ कॅम्पेनची २००९ मध्ये सुरुवात केली. या मोहिमेत आतापर्यंत २ हजार २८० प्लेटलेट्स दात्यांनी नोंदणी केली आहे. मुंबईत सुरू झालेल्या मोहिमेत ६ हजार प्लेटलेट्स दात्यांच्या नोंदणीचे लक्ष्य आहे. देशात दरवर्षी ७० हजार प्लेटलेट्सची गरज भासते.
या अभियानात आतापर्यंत २ हजार २८० प्लेटलेट्स दाते मिळाले आहेत. पैकी ९८० प्लेटलेट्स दान केले आहे. तर ७५ जणांनी १० हून अधिक वेळा, १५ जणांनी २५ हून अधिक वेळा आणि तीन जणांनी तर १०० हून अधिक वेळा प्लेटलेट्सचे दान केले आहे.
देशात दरवर्षी १२ लाख युनिट रक्ताची आवश्यकता असते. पण प्रत्यक्षात १० लाख युनिट रक्त जमा होते. देशात फक्त ५ टक्के लोक रक्तदान करतात, तर परदेशात हे प्रमाण ४० टक्के इतके आहे. प्लेटलेट्सच्या कमतरतेच्या मुख्य कारणांमध्ये माहितीचा अभाव प्रमुख आहे. याबाबत जनजागृती झाल्यास प्लेटलेट्स दानाचा टक्का वाढेल, हा वाढलेला टक्का नक्कीच फायद्याचा असेल, असे मत रुग्णालयाच्या ट्रान्सफ्युजन विभागप्रमुख डॉ. सुनील राजाध्यक्ष यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)