शाळांची आधार नोंदणी आता स्वतंत्र नोंदणी यंत्राद्वारे होणार - शिक्षण विभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 04:57 AM2019-01-21T04:57:40+5:302019-01-21T04:57:46+5:30
शालेय विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचा गोंधळ टाळण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि संगणक प्रोग्रामर यांची नियुक्ती करावी, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत.
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचा गोंधळ टाळण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि संगणक प्रोग्रामर यांची नियुक्ती करावी, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात दोन आधार मशीन याप्रमाणे ४०८ तालुक्यांसाठी ८१६ आधार नोंदणी यंत्रे देण्यात येणार आहेत. ही यंत्रे खरेदी करण्यासाठी यूआयडीने समग्र शिक्षण अभियानकडे निधी दिला आहे.
सध्या किती विद्यार्थ्यांकडे आधार क्र मांक आहेत त्याची पाहणी करून हे क्र मांक संकलित करावेत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्र मांक नसतील, त्यांचे आधार कम्रांक काढण्यासाठी प्रत्येक शाळेत शिबिरे घेण्यात यावीत. तसेच आधार नोंदणी संदर्भातील फॉर्म पालकांनी भरु न द्यावेत. पहिली, नववी आणि दहावी या इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. यासंदर्भात शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, यूआयडीचे सुन्मेश जोशी, सहसचिव सुवर्णा खरात, विद्याप्राधिकरणाचे सुनील मगर आणि अवर सचिव संतोष गायकवाड आदींची बैठक नुकतीच सह्याद्री अतिथीगृहात झाली.
विद्यार्थी शाळा प्रवेश तसेच आरटीईअंतर्गत होणारे प्रवेश यासाठी आधार घेणे जरी सक्तीचे नसले तरी मध्यान्ह भोजन, शिष्यवृत्ती, शिक्षक मान्यता यासाठी आधार नोंदणी आवश्यक आहे. आधार नोंदणी, अपडेशन तसेच सरल नोंदणीसाठी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी आवश्यक असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
आधार कार्ड नसल्यामुळे चार लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची बँक खाती उघडलेली नाहीत. अनेकांच्या नावात चूका असल्यामुळे हा गोंधळ समोर आला आहे. यासाठी पुन्हा विद्यार्थ्यांची आधार नोंदणी हाती घेतली आहे. पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती युनिक आयडेंटिटी कोडच्या माध्यमातून जमवण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
>आमची गेली पाच वर्षे हीच मागणी आहे की शिक्षण विभागाने शाळेत यावे व आधार नोंदणी करावी. प्रत्येकवेळी शाळा व शिक्षकांवर अविश्वास, एकदाचे सत्य सर्वांसमोर येईल. आमचा विरोध नाही तर स्वागत आहे. मात्र आता ९० टक्के शाळांकडे प्रत्यक्षात आधार असताना ही जाग का?
- प्रशांत रमेश रेडीज, सचिव, मुंबई मुख्याध्यापक संघटना