जहाजांची नोंदणी, भारतीय नाविक मुंबई बंदरात परतणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 07:18 PM2020-06-10T19:18:25+5:302020-06-10T19:18:45+5:30
जगाच्या विविध भागात समुद्रात जहाजांवर असलेल्या नाविकांना कोरोनामुळे जगात ठिकठिकाणी अडकून राहावे लागले होते. केंद्र सरकारने याबाबत त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्यानंतर विविध देशांतील प्रवासी जहाजे भारतात परतु लागली आहेत.
खलील गिरकर
मुंबई: जगाच्या विविध भागात समुद्रात जहाजांवर असलेल्या नाविकांना कोरोनामुळे जगात ठिकठिकाणी अडकून राहावे लागले होते. केंद्र सरकारने याबाबत त्यांना दिलासा देणारा निर्णय घेतल्यानंतर विविध देशांतील प्रवासी जहाजे भारतात परतु लागली आहेत. मुंबई बंदरातील पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत सहा जहाजांतील 1895 भारतीय नाविक भारतात यशस्वीरित्या परतले आहेत. तर, नजिकच्या काळात मुंबईत येण्यासाठी आणखी 12 जहाजांनी नोंदणी केली असून त्याद्वारे सुमारे नऊ हजार भारतीय नाविक भारतात परतणार आहेत.
विविध देशांच्या समुद्रात कार्यरत असलेले हजारो भारतीय नाविक विविध जहाजांमध्ये अडकले होते. केंद्र सरकार ने त्यांना कोरोना संक्रमण काळात भारतात परतण्यावर बंदी घातल्याने त्यांचा परतीचा मार्ग खुंटला होता. मात्र कालांतराने केंद्र सरकारने त्यांना भारतात परतण्याची मुभा दिल्याने जगाच्या विविध भागातील समुद्रात अडकलेले नाविक मुंबईत परतू लागले आहेत. गेल्या आठवड्यात दोन जहाजांतील नाविक मुंबई त परतले. ओएसिस ऑफ सीज या जहाजातील 840 भारतीय नाविक मुंबईत दाखल झाले तर त्यापूर्वी वायकिंग ओरिएन या जहाजातील 55 नाविक परतले.
केंद्र सरकार च्या निर्देशांनुसार या नाविकांच्या प्रवासाची माहिती घेतली जाते. या सर्व नाविकांची कोविड 19 ची तपासणी जहाजावर केली जाते व अहवाल नकारात्मक आल्यानंतर जहाजाला बर्थ वर आणण्यात येते. त्यानंतर सर्व नाविकांना क्रुझ टर्मिनल मध्ये आणून सर्व प्रक्रिया केल्यानंतर त्यांना महापालिका प्रशासनाकडून होम कॉरन्टाईनचे शिक्के मारण्यात येतात. त्यांना राज्यात व देशात विविध राज्यात जाण्यासाठी आवश्यक असलेले ई पास उपलब्ध करुन देण्यात येतात व त्यांना घरी पाठवण्यात येते, या प्रक्रियेचे पालन करुन या सर्व नाविकांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती भारतातील क्रुझ शिपिंगचे समन्वय अधिकारी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे वरिष्ठ अधिकारी गौतम डे यांनी दिली. देशभरात इतक्या मोठ्या प्रमाणात नाविकांना घरी पाठवण्याची कामगिरी सध्या केवळ मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये केली जात आहे.