मुंबई : राज्यात ३० नवीन कापूस खरेदी केंद्र नियोजित असून, त्यापैकी ११ केंद्रांवर हमीभावाने कापूस खरेदी सुरू झाली आहे. उर्वरित कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावीत, असे निर्देश पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. ॲपद्वारे जमा केलेल्या अद्ययावत माहितीमुळे शासनाकडे शेतकऱ्यांची अचूक माहिती संकलित होईल आणि कापूस परतावा योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळेल, असेही ते म्हणाले.राज्यात सुरू करण्यात आलेल्या कापूस खरेदी केंद्राचा आढावा आणि नवीन कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक झाली. पणन महासंघाद्वारे नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या ३० कापूस खरेदी केंद्रांपैकी नागपूर, वणी, यवतमाळ, अकोला, खामगाव, औरंगाबाद, परभणी, परळी, नांदेड आणि जळगाव या ११ ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. त्यावर उर्वरित केंद्रे सुरू करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी. शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ, कापूस लागवडीच्या अनुषंगाने ७/१२ची तपासणी, बँक खात्याची माहिती आणि आधारकार्डद्वारे ओळख पटविणे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर केंद्राद्वारे ॲपचा वापर करावा. सरकी आणि रूईच्या नुकसानीबाबतची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले.
राज्यात कापूस खरेदीसाठी ॲपद्वारे नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 3:46 AM