मुंबई : १ जून २०१८ पासून पासून सुरू झालेल्या आयटीआय प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १ लाख ९६ हजार ९११ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन नोंदणी केल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून मिळाली आहे. राज्यभरात आयटीआयच्या खासगी आणि शासकीय दोन्ही मिळून १ लाख ३६ हजार १९३ जागा उपलब्ध आहेत. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. त्यामुळे आयटीआय प्रवेशासाठी गुणवत्तेचा कस लागणार आहे. अर्ज सादक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार १८४ विद्यार्थ्यांच्या अर्जाची निश्चिती करण्यात आली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयतर्फे आयटीआय प्रवेश केंद्रीय पद्धतीने होत आहे. यामधील मुंबई विभागात १९,५८१ जागा असून, १६,३६७ जागा शासकीय तर ३,२१४ जागा खासगी प्रशिक्षण संस्थांच्या आहेत. सध्या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आयटीआय प्रवेश घेण्याकडे यंदा कल वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आयटीआयसाठी दोन लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 6:07 AM