मुंबई : सीईटीचा निकाल जाहीर होऊन १० दिवस उलटल्यानंतर सोमवारी, १७ जूनला हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग, बी फार्मसी, इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि आर्किटेक्चर या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी सेलमार्फत जाहीर करण्यात आले. या चारही अभ्यासक्रमाच्या नोंदणीची सुरुवात सोमवारपासून झाली असून, नोंदणीची मुदत २१ जूनपर्यंत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत नोंदणी करून कागदपत्रे पडताळणी करून घेण्याचे आवाहन सीईटी सेलमार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.यंदा ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीईटी दिली. मात्र, व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची नियमावली तयार करण्यास विलंब झाल्याने, व्यवसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली होती. अखेर तंत्रशिक्षण संचालनालयाने पात्रतेचे निकष, नियमावली सीईटी सेलकडे सादर केल्यानंतर, या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यास सोमवारपासून सुरुवात करण्यास मंजुरी मिळाली. त्यानुसार, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी अपलोड करण्यात आले आहे. यानंतर लवकरच मेडिकल प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त आनंद रायते यांनी दिली.७ जूनपासून तालुकानिहाय सुरू करण्यात आलेल्या सेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून कागदपत्रे पडताळणीपर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील. यासाठी राज्यात तब्ब्ल ३७३ सेतू केंद्रांची सुविधा सीईटी सेलने उपलब्ध करून दिली आहे. तालुकानिहाय सेतू केंद्रांची माहिती विद्यार्थी-पालकांना सीईटी सेलच्या ‘सार’ या पोर्टलवर मिळेल. आतापर्यंत या पोर्टलवर २ लाख ११ हजार ३७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी १ लाख ५७ हजार ३२५ विद्यार्थी आता सेतू केंद्रांवरून मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती रायते यांनी दिली.प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रकआॅनलाइन नोंदणी - १७ जून, २०१९ ते २१ जून, २०१९कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज निश्चिती - १७ जून, २०१९ ते २१ जून, २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)तात्पुरती गुणवत्ता यादी - २२ जून, २०१९काही तक्रार असल्यास सेतू केंद्रांवर तक्रार नोंदविणे - २३ जून, २०१९ ते २४ जून, २०१९ (सायं.५ वाजेपर्यंत)अंतिम गुणवत्ता यादी - २५ जून, २०१९प्रवेश घेणे सुलभसेतू केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे सादर करण्याची सुविधा असल्याने, त्यांना प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी महाविद्यालय किंवा संस्थेकडे जावे लागणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. सेतू केंद्रावर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाल्यानंतर त्यांना प्रवेश घेण्यास सुलभ होईल, तसेच प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल.- आनंद रायते,आयुक्त, सीईटी सेल.
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची नोंदणी सुरू; वेळापत्रक जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 4:51 AM