- मनोहर कुंभेजकर
मुंबई - मुंबई मनपाच्या ३ हजार विद्यार्थिनींना दरमहा नियमित १० सॅनिटरी पॅड मोफत देण्यात येणार असून त्यांची मोफत आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे. वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार व पॅडवुमन डॉ. भारती लव्हेकर या हा अभिनव उपक्रम राबवणार आहे. अशाप्रकारचा हा राज्यातला पहिलाच उपक्रम आहे. त्यांच्या ' ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके ' च्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाची घोषणा येत्या २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता वर्सोवा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येईल. मुंबईतील ५२ महानगपालिका शाळा या कार्यक्रमात सहभागी होणार असून सुमारे ३ हजार मुलींना १० सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप दरमहा नियमित स्वरूपात करण्यात येणार आहे. 'ती फाउंडेशन' च्या त्या संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी देशातील पहिल्या डिजिटल सॅनिटरी पॅड बँके ची स्थापना गेल्या २८ मे रोजी ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनी’ केली. महिलांच्या त्या ५ दिवसांच्या वेदना अधिक सुसह्य करून त्यांना सॅनिटरी पॅड्सची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 'ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँक’ कार्यरत असून 'ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके' च्या माध्यमातून सॅनिटरी पॅड्सचे मोफत वाटप, मोफत सॅनिटरी पॅड एटीएम व्हेंडिंग मशीन, डिस्पोझल मशिन्स, मॅनस्ट्रुअल हेल्थ किटची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.तसेच महिलांना स्त्रीरोगतज्ज्ञांचा मोफत सल्लाही उपलब्ध करून दिला जातो. 'ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके’ तर्फे दरमहा गरीब विद्यार्थिनी आणि स्त्रियांना १० सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले जाते.मेन्स्ट्रुअल हेल्थ किटमध्ये विविध सूचना, मानसिक आधार देण्यासाठीची माहिती, २ निकर्स, पेनकिलर्स आणि सॅनिटरी पॅड्स या गोष्टी देण्यात येतात. या लोक चळवळीचा लाभ जास्तीत-जास्त गरीब मुलींना व्हावा या उद्देशाने आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या ' ती फाउंडेशन' या संस्थेने मुंबईतील ५२ महानगरपालिका शाळांतील मुलींना सॅनिटरी पॅड आणि आरोग्य तपासणी सुविधा मोफतरित्या पुरवण्याचा निश्चय केला आहे. मुंबईमधील महापालिकेच्या ५२ शाळांशी संपर्क साधून मासिक पाळी आणि त्यादरम्यान आवश्यक असणा-या स्वच्छतेबद्दल प्रबोधन करण्याचे ध्येय त्यांच्या ' ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँक' करणार आहे. जुन्नर तालुक्यातील आलमे येथील शासकीय अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील ५५ गरीब आदिवासी विद्यार्थिनींना नियमितरित्या दरमहा १० सॅनेटरी पॅड उपलब्ध करून दिले जातात. महाराष्ट्रातील इतर शाळांमध्येही हा उपक्रम राबवण्याचा मानस0 असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली. देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, हरियाणा, चंदीगड या विविध राज्यांमधून ' ती फाउंडेशन सॅनिटरी पॅड बँके' ला चांगला प्रतिसाद लाभत आहे. तर अफगाणिस्तान, पाकिस्तान, आफ्रिका सारख्या देशातून पॅड्सची मागणी येते.एड्सग्रस्त महिला आणि रेड लाईट भागात पॅड पुरवण्याची मागणी पॅड बँकेला आली असून चेन्नई मधील एका शाळेची मोफत सॅनिटरी पॅड्सची मागणी आहे. आमदार डॉ. लव्हेकर यांच्या कामाची पोचपावती म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या २० जानेवारी रोजी राष्ट्रपती भवन येथे 'फर्स्ट लेडी' या बहुमानाने गौरविण्यात आले. तसेच 'जागतिक महिला दिनी' विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करत आपल्या नावाचा ठसा उमटवणा-या देशातील केवळ ४०० कर्तबगार महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे पत्र लिहिले होते.त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहून त्यांच्या पाठीवरही कौतुकाची थाप दिली आहे.