लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्वोच्च न्यायालयात सोमवारपासून मराठा आरक्षणावरील सुनावणीस सुरुवात हाेत आहे. सध्या व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार असून, सुनावणीसाठीची पूर्ण तयारी झाल्याचे मराठा क्रांती मोर्चा आणि आरक्षण समर्थकांनी म्हटले. मराठा आरक्षणाबाबत जयश्री पाटील (सदावर्ते) विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य व विनोद नारायण पाटील अशी ही सुनावणी होईल.
सुनावणी संदर्भात मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, या सुनावणीसाठी आमची पूर्ण तयारी झालेली आहे. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले आहे व ते कायद्याच्या चौकटीतही टिकेलच, असा मला पूर्ण विश्वास आहे. तर, सुनावणीसाठी गिरगाव येथील शारदामंदिर हायस्कूलच्या बोर्ड रूममध्ये प्रोजेक्टरची व्यवस्था केल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली.
प्रत्यक्ष सुनावणीसाठी राज्य सरकार आग्रहीमराठा आरक्षण सुनावणीची व्याप्ती लक्षात घेता प्रत्यक्ष सुनावणी व्हावी, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली. मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ समितीचे प्रमुख व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनीही प्रत्यक्ष सुनावणीचा आग्रह धरणार असल्याचे विधान परिषदेत स्पष्ट केले. सध्या सर्वोच्च न्यायालयात व्हीसीद्वारे सुनावण्या होत आहेत. कदाचित १५ मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणीस न्यायालय तयार होईल आणि मधल्या काळातील तारखा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता यासंदर्भातील जाणकारांनी व्यक्त केली.